जवानाचे मनोगत
जवानाचे मनोगत
जेव्हा जेव्हा शत्रू करतो हल्ला तेव्हा आम्ही लढतो शौर्यानं,
त्यांच्या तावडीत सापडलेल्या जवानाला ते वागवतात क्रौर्यानं
आम्ही रात्रंदिवस सीमेवर उभं राहतो शत्रूची करत निगराणी डोळ्यात घालून तेल,
देशांतर्गत भ्रष्टाचारी, गुन्हेगारांना कशी काय मिळते बेल?
आम्ही सोडलंय घरदार तुमच्या सुखासाठी फक्त,
तुमचं वागणं बघून वाटतंय तुम्हालाही हवेत कायदे सक्त
सगळ्या प्रकारच्या संकटांना तोंड देत आम्ही लढतो निसर्गाशी,
तुमच्या चुकीच्या वागण्यामुळं जगाचा पोशिंदा शेतकरी घेतोय फाशी
फक्त स्वातंत्र्यदिनी झेंड्याला वंदन करुन सिद्ध होत नाही देशभक्ती
यासाठी लागते अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द आणि शक्ती
अंतर्गत यंत्रणा करा मजबूत प्रत्येक नागरिकानंही व्हावं कर्तव्यतत्पर
नुसतं संविधानाने दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करत प्रशासनावर नका फोडू अपयशाचं खापर
कुठलीही दयामाया न दाखवता देशद्रोह्यांना करा शासन,
कृती महत्वाची, काय उपयोगाचं हंगामी भाषण?
आपल्याला मिळते प्रेरणा इतिहासाकडून, थोडं अमलातही आणा,
अभिमानाने, निधड्या छातीने जयहिंद-वंदेमातरम म्हणा!
