जपा पावित्र्य स्वातंत्र्याचे
जपा पावित्र्य स्वातंत्र्याचे
स्वातंत्र्याचे गीत नवे हे पुन्हा पुन्हा गावे
गुलामगिरीच्या गावी आता कुणी कधी न जावे
शहीद झाले लढले अनेक भारतभूचे पूत्र
ना हटले ना थकले त्यांनी सांडविले रक्त
क्षितिजावरती मग उगवला स्वातंत्र्याचा सूर्य
स्मरण ठेवा सदैव अदभूत स्वातंत्र्यलढ्याचे पर्व
अनमोल हे स्वातंत्र्य मिळाले तुम्हां आम्हां आयते
म्हणूनच वाटत नाही आम्हां महत्त्व त्याचे कोणते
जीवन अपुले झाले बघा सुखकर अन बिनधास्त
स्वातंत्र्याची फळे चाखती सानथोर सारे मस्त
ठेवावी मात्र सदा अपुल्या एक गोष्ट ध्यानात
स्वातंत्र्य असे स्वैराचार नव्हे हे ठसवा पक्के मनात
स्वातंत्र्याचा आनंद लुटा ठेवूनी विवेकबुद्धी सतर्क
राहू नका मदमस्त होऊनी फक्त स्वार्थात गर्क
अपुल्या स्वातंत्र्यासाठी दिले बलिदान हो जयांनी
जपा पावित्र्य स्वातंत्र्याचे , विभूतींना त्या स्मरूनी
इतरांच्याही स्वातंत्र्याचा विचार करावा जरा
जगा आणि जगू द्या हा मंत्र जपावा न्यारा
टिकविणे हे स्वातंत्र्य ही असे नैतिक जबाबदारी
तीच असेल श्रद्धांजली अपुली शहिदांप्रती खरा
