झेप तुझ्या कर्तृत्वाची
झेप तुझ्या कर्तृत्वाची
होती सांभाळत ती चूल नि मूल
आणि काढत होती साऱ्यांची उष्टीखरकटी
तिला न पडायची कशाची भूल
जीवनात नव्हती तिच्या कशातच बळकटी
कुंपणाबाहेर पडणे तिला जमतच नव्हते
आपलं अस्तित्त्व शोधणं तिला पटत नव्हते
संसाराच्या गाड्याला तिने स्वतःला जुंपल होतं
त्याच्याशिवाय दुसरं काही तिला माहीतच नव्हतं
माणूस म्हणून जगायचं हे तिला ठाव नव्हतं
घराबाहेरही आहे जग हे तिच्या मनी नव्हतं
जगत होती हे दुष्कर जगणं मान मोडून
आयुष्यच नव्हतं तीच जणू संसार सोडून
या सगळ्यात जागवला आशेचा एक किरण
सावित्रीबाईंनी ज्ञानाची पेटवून दिली ज्योत
ज्योत तेजस्वी करून तिची बनवली मशाल
स्त्री मुक्तीला तिथूनच वाचा फुटली
शिक्षण घेऊन मग ती सुशिक्षित जाहली
प्रगती करून स्वतःची ,तिने आकाशीझेप घेतली
नानाविध क्षेत्र पादाक्रांत करत करत निघाली
आणि आता पुरुषांच्या बरोबरीने उभी राहिली
