झाले मोकळे आकाश
झाले मोकळे आकाश
निशांत वसुंधरेला
अचंबित करु पाहे
स्मित हास्य फुलवूनी
धुंद वाऱ्या संगे वाहे
वसुंधरा सुखावली
त्याच्या सुआगमनाने
संगे पुष्प तरु वेली
पाहे वाट सन्मानाने
मोठाल्या ललकाराने
शिटी वाजवून वारा
त्याला पाहूनि नभाति
पहा ओसरल्या गारा
पडलेल्या त्या गारांना
चातक उचलू पाहे
गीत गाऊन हर्षाचे
सांगे राजा आला आहे
खडकातून गवत
मान उंचावून राहे
बळीराजा हाकवण्या
ढवळ्या पवळ्या पाहे
लागल जणू उगवू
काळ्या मातीतलं सोनं
बहरला हमीभाव
चालू लागे खोटं नाणं
घोरकष्टा आज लाभे
लख्ख लख्ख स्वप्रकाश
पाहता सभोवताली
झाले मोकळे आकाश
