झाडं
झाडं
झाडं टाकत नाही हिरवेपण
पानं झडून गेली तरीही....
वसंताची स्वप्न उराशी घट्ट धरत
ती जपत असतात घेतलेला वसा सावली देण्याचा!
देशाच्या सीमा ओलांडून गेल्यावर
बदलतात रंग माणसाचे!
दगड विटांच्या जंगलांचे....
पण झाड जपून असतात त्यांचं दातृत्वाचं हिरवेपण...सदैव !
झाडांना बोलता येत नाही , ते खूप बरं आहे, एकार्थाने,
नाहीतर मग त्यांनाही लागल्या असत्या भाषा
भाषेवरून मग जाती,
जातीवरून मग धर्म वगैरे
मग गळून गेलं असतं त्यांच्यातलं निरागस हिरवेपण....
झाडांना कान नाहीत, डोळे नाहीत
सजीव असलित तरीही किती बराय....
नाहीतर त्यांचीही झाली असती कानभरणी....
दिला गेला असता एखाद्या रंगाचा झेंडा त्यांच्या हातात !
म्हणून झाड आपली मुळं घट्ट रोवून असतात.....
त्यांना माणसाची बाधा होऊ नये, म्हणून ! -----
