जाग तू रणचंडिके
जाग तू रणचंडिके
जाग तू रणचंडिके,
सुरू आजही द्रौपदीचे वस्त्रहरण...
पुरे झाला हा पुरूषी छळ,
व्हावे आता दुर्योधनाचे मरण....
दे झुंज होऊन काली,
कर दफन व्यथेचे विषारी काटे...
दाखवून दे अबलेचे अफाट बळ ,
छाटून टाक नरषंढांची बोटे....
झुगारून बंधने सारी,
दाखवून दे नारी शक्ती...
तूच दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी,
विश्वकर्म्यानेही करावी तुझी भक्ती....
कहर झाला अग्निपरीक्षेचा ,
जाळून टाक पुरूषी अहंकार...
दाखवून दे तुझ्या विद्वत्तेचे तेज ,
होवू दे तुझ्या कर्तबगारीचा जयजयकार....
स्वरक्षणाचे गिरवून धडे ,
घे हाती हिम्मतीची बळकट मशाल...
पेटवून टाक वखवखलेल्या नजरा,
कर शिकार वासनांध्यांची खुशाल....
घे विजयाची पताका हाती,
होऊन मुक्त आकाशपरी....
विजयध्वज कर्तृत्वाचा,
फडकू दे त्रिभुवनावरी....
घडव आता तूच शिवबा,
घेऊन वारसा जिजाऊ चा....
जागव तुझ्यातील सृजनशीलता,
काळ ठरावा अन्याय अत्याचाराचा....
