हरवलेलं गाव माझं
हरवलेलं गाव माझं
इटुकल पिटुकल गाव माझं
गर्द वनराईत लपलेलं
निसर्ग राज्याच्या कुशीत
अन पर्वतांच्या बाहूत वसलेलं
गावच्या पोरांसोबत खेळे
उनाड अल्लड गार वारा
हळूच खेळण्या गोपाळांसवे
साद घालितो निळाशार झरा
पाहण्या गम्मत खेळांची त्या
डोकावले हळूच ऊन कोवळे
टण टण घंटेच्या नादाने
पहा दुमदुमली सारी देऊळे
कष्टाची शिदोरी हाती घेऊनि
निघाला शेतात बाप माझा
घामाने त्याच्या फुलला अंकुर
अन बहरला कण मोत्याचा
नाही सोनं ,हिरा,माणिक
नाही कोणी येथे श्रीमंत
भिजलेली दिसे येथे प्रेमाने
झोपडीची फाटकी भिंत
हरवला माझा गाव आता
हरवले सारे सोनेरी क्षण
सुबक भिंतीला शहरातील
मुळीच नाहीत प्रेमाचे कण
