हरवलेले बालपण
हरवलेले बालपण
जणू स्वप्नातले दिवस ते
गोंजारून घ्यायचे
बाबांच्या मांडीवर बसून मग
आईच्या कुशीत झोपायचे
दिवसच ते बालपणीचे ॥१॥
मामाच्या गावाला जाऊन
आजीच्या हातचा लाडू खाऊन
नदीच्या पात्रात डुंबायचे
नी मग आमराईत हुंदडायचे
दिवसच ते बालपणीचे ॥२॥
शाळेला बुट्टी मारून
घरी आराम करायचे
अभ्यासाच्या नावाने
पोटात कळ येणारे
दिवसच ते बालपणीचे ॥३॥
गणपतीत मोदक भरपेट खाऊन
दिवाळीत फटाके फोडणारे
सणवार मजेत घालवून
संस्कारांना रुजवून घेणारे
दिवसच ते बालपणीचे ॥४॥
ताई दादा बरोबर
मस्ती करणारे
मित्रां बरोबर दंगा करून
प्रेम तेवढेच देणारे
दिवसच ते बालपणीचे ॥५॥
अनेक आठवणींचा पिंगा
मनात घालून फिरणारे
आता पुन्हा न येणारे
पण नेहमीच आठवत राहणारे
होय, दिवसच ते हरवलेल्या बालपणाचे ॥६॥
