हरितक्रांती
हरितक्रांती
संधी आहे मानवा तुझ्या हाती
निसर्गाला या फुलवण्याची
पैशाच्या हव्यासापाठी नको
जीवन व्यर्थ घालवण्याची
करुनी वृक्षारोपण इथे
फूलव सुंदर सजीवसृष्टी
नको प्रदूषण नि दुष्काळ
होईल जलधारांचीही वृष्टी
मानवा हो आता जागा
घे हाती फावडे कुर्हाड
येऊ नये तुझ्यावर कुवेळ
पाठीवर घेऊन फिरे बिर्हाड
फुलव शेतमळा आनंदाने
पावसाच्या बरसू दे अमृत सरी
धरणी न्हाऊ दे ओलीचिंब
पाण्याने भूजलाचे साठे भरी
झिरपुदे पाणी भेगाळलेल्या भूईत
दुष्काळाने भेगाळल्या रानीवनी
दिवस येतील सुखाचे फुलवील
बळीराजा पीक मग सोन्यावाणी
सिमेंट काँक्रिटच्या जंगलात
वाळू मातीची ही झालीय धूप
पालापाचोळा नि ग्रास हिरवळ
आडवतील झऱ्याचे पाणी खूप
नकोय विषारी जल, वायू प्रदूषण
कवटाळायला लावी मर्त्य जीवांना
हिरवळ झाडे वाढवू द्या धरेवर
आनंद होईल साऱ्या पशुपक्ष्यांना
बांधतील घरटी पक्षीपाखरे
झाडावरच्या त्या गर्द फांद्यात
किलबिलाट करतील रानभर
भरारतील आनंदाने गगनात
पहूडतील वाटसरू गाढ छायेत
पशु प्राण्यांना मिळेल सहारा
फुलू लागेल सारी सजीव सृष्टी
पाहून निसर्गाचा मनोहर पसारा
