हृदयावरचे ओरखडे
हृदयावरचे ओरखडे
तुमच्या जखमेला मेडिसीनच्या जगतात
आजार म्हणून गणलंच नाही
हृदयावरच्या ओरखड्यांवर डॉक्टर म्हणतात
औषध अजून बनलंच नाही ||1||
प्रेम नावाचा कोणताच व्हायरस
नाही आमच्या पुस्तकात
काहीतरी मानसिक रोग आहे
हा तुमच्या मस्तकात
याला आमच्या लॅबने आजवर
शोधल्याचं तरी मानलंच नाही
हृदयावरच्या ओरखड्यांवर डॉक्टर म्हणतात
औषध अजून बनलंच नाही ||2||
डायबेटीस, हृदयरोग, कावीळ
बरीच मोठी रोगांची नोंद आहे इथे
थकलेत सारे रिसर्च करून
या व्हायरसच्या नावाने बोंब आहे इथे
नक्की याचा संसर्ग कसा होतो
आम्ही कधी जाणलंच नाही
हृदयावरच्या ओरखड्यांवर डॉक्टर म्हणतात
औषधं अजून बनलंच नाही ||3||
निद्रानाश, तणाव, नैराश्य
ही याची लक्षणं तर दिसतात
चक्कीच्या दोन चाकात जशा
रोग्याच्या भावना पिसतात
आजवरच्या स्टडीत मेडिसिनचं
नाणं मात्र खणखणलंच नाही
हृदयावरच्या ओरखड्यांवर डॉक्टर म्हणतात
औषध अजून बनलंच नाही ||4||
लस येतेय का या व्हायरसवर भविष्यात
आपण जरा बघूया
तोपर्यंत असंच तडफडत रडत
भ्रमिष्टासारखं जगूया
मेडिसिन जगतात उपाय म्हणून कोणाचं
डोकं कधी भणभणलंच नाही
हृदयावरच्या ओरखड्यांवर डॉक्टर म्हणतात
औषध अजून बनलंच नाही ||5||
हा व्हायरस आहे या जगात
इतकं मात्र खरं
पण खरं सांगतो यांच्यापासून
दूर राहिलेलं बरं
असा कोण आहे ज्याचं हृदय
याच्या वेदनेने कण्हलंच नाही
हृदयावरच्या ओरखड्यांवर डॉक्टर म्हणतात
औषध अजून बनलंच नाही ||6||
नॉर्मल आजारासारखी लक्षणं
दिसतच नाहीत इथे
लॅबचे रिपोर्ट्स नेहमीच इथे
येतात का रिते
सर्दी तपासारखं रोग्याचं अंग
वेदनेनं कणकणलंच नाही
हृदयावरच्या ओरखड्यांवर डॉक्टर म्हणतात
औषध अजून बनलंच नाही ||7||
