होलिकोत्सव
होलिकोत्सव
दु:ख, दैन्य, दूर व्हावे होलिका दहनासवे।
ओठांवर हसू फुटावे, दूर पळावी आंसवे॥
झेलल्या सा-या यातना, मूकपणे वर्षांतरी।
वावटळ होऊन उडाव्या, दूर नभीं गगनांतरी॥
दाह व्हावी अंतर्मनाला, व्यापलेली काजळी।
शुचिर्भूत मन शांत व्हावे, रात्र सरता वादळी॥
होलिकेचे लोट भिडले, चांदण्यास गगनामध्ये।
अमृताचा कुंभ घेऊन,परतले सृष्टीमध्ये॥
शांत आता विश्व झाले, शांत सा-या वेदना।
नवरसांची, नवरंगांची, चिरंतन संवेदना॥
लोपला काळोख सारा, सूर्य उजळे नभांतरी।
पौर्णिमेला साक्ष ठेवून, उधळे रंग पिचकारी॥
पाहता त्या गुलालरंगा, चित्त वृत्ति खुलल्या पुन्हा।
वसंताच्या आगमनाची चाहूल हर्षवी तन-मना॥
होलिकेने दूर नेल्या, माझ्या मनी साचल्या व्यथा।
कृतज्ञता दाटे अंतरी, मन सिद्ध सुखाच्या स्वागता॥
