हे जगणे मी तुमच्या कडून शिकले
हे जगणे मी तुमच्या कडून शिकले
हे जगणं मी तुमच्या कडून शिकले
"कौन कहता है आसमां में सुराख नही हो सकता, एक पत्थर तो तबियत से उछालो यारों।
दुष्यंत कुमार यांनी लिहिलेल्या या वरच्या ओळीत म्हटल्या प्रमाणे सर्व सामान्य माणसाने देखील ठरवून प्रयत्न केले तर तो ही यशस्वी होतो. हा त्यांचा अनुभव सगळ्यांसोबत वाटला तर अनेक लोक त्यांच्या सारखे यशस्वी होण्यासाठी अडचणींवर मात करत पुढे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करतील.
एखाद्याने खूप प्रसिद्धी मिळाल्यानंतर किंवा उतार वयातच आपले आत्मचरित्र लिहीले पाहिजे असे काही नाही. अगदी सर्वसामान्य माणूसही त्याच्या आयुष्यातील अनेक घटनांना तो कसा सामोरा गेला? आणि त्यातून कसा घडला? हे अनुभव रुपात मांडू शकतो. अनुभवांमधून शिकत असताना त्याला लागलेला वेळ इतरांना वाचवता येईल. जगभरातल्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे चरित्र आपण वाचतो. त्याचबरोबर जर सर्वसामान्यांचे अनुभव सुद्धा आपल्याला ऐकायला मिळाले तर ज्ञानाचा एक खूप मोठा खजिना आपल्यासाठी तयार होऊ शकतो.
एखाद्या व्यक्तीच्या या जगातून जाण्याने त्याच्या घरच्यांना किंवा जवळच्या नातेवाईकांना वाईट वाटते कारण त्यांच्यावर प्रेम करणारी, जीव लावणारी एक व्यक्ती त्या कुटुंबातून कमी झालेली असते. हे जसे खरे आहे तसेच हा विचार आज आपण एका वेगळ्या बाबतीत करुन बघूत.
एखादी व्यक्ती जगातून जाण्याआधी तिच्यामध्ये असलेले ज्ञान, अंगात असलेल्या कला, आलेले अनुभव आणि त्यातून घेतलेली शिकवण यांची शिदोरी इतरांना न देताच या जगातुन निघून गेली तर ते खऱ्या अर्थाने ह्युमन रिसोर्सचा पूर्ण वापर न केल्या सारखे होईल. एकंदरीत ते समाजाचे आणि देशाचे नुकसान असते. कारण त्या व्यक्ती सोबत ते सारे संपून जाते... पुढच्या पिढीला न मिळता!
आयुष्यभर खूप कष्टाने, अनुभव घेत प्रत्येक व्यक्ती काही ना काही शिकत असते.प्रत्येकाला येणारा अनुभव वेगळा असतो. जडणघडण अनेक पद्धतीने झालेली असते. त्याचा परिणाम होत, कुठेतरी ती व्यक्ती त्यावर आधारीत काही बाबतीत तिचे स्वत:चे काहीतरी ठाम असे मत बनवत असते. प्रत्येकाच्या अनुभवांचं क्षेत्र जितकं विस्तारत जात तितकं आयुष्याच्या क्षितीजावर इंद्रधनुष्य सप्तरंगी आणि विविध रंगी होत. इतरांचे जीवन असे समृद्ध करण्यात आपला हातभार लावू असा विचार करुन प्रत्येकाने प्रयत्न करावा स्वानुभव सांगण्याचा! आज मी ही करत आहे.
" इतरांना आपण कधीच स्वत:पेक्षा कमी लेखू नये!"
ही शिकवण कदाचित लहानपणापासूनच अनेक जणांकडून मिळत गेली. त्यामुळेच एकेक अनुभव गाठीला पडत गेले आणि पाय सुदैवाने जमिनीवर टिकून राहिले. इथून पुढेही ते असेच जमिनीला खिळलेले असावेत आणि नजर भव्य आकाशा सारख्या उच्च ध्येयावर रोखलेली असावी ही सदैव प्रार्थना! आजवर अनेकांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सावरणारे हात लागले मला एक व्यक्ती म्हणून घडवत असताना, त्या सर्वाना मनापासून नमन!
"माटी कहे कुम्हार से तू क्या रौंधे मोहे ? एक दिन ऐसा आयेगा.... मैं रौंधुंगी तोहे।"
असे म्हणतात की एक चांगला कुंभार त्याने बनवलेले प्रत्येक मडके वाजवून बघतो. ज्याचा आवाज ज्या मडक्यावर मारल्यानंतर टणकन येतो, ते पक्के मडकेच तो बाजारात पाठवतो विक्रीसाठी. खराब मडक्याला पुन्हा मोडून परत एकदा मातीला खूप कुटून, मऊ करून त्यातून तो नव्याने चांगले मडके घडवण्याचा प्रयत्न करतो.
जगातले प्रत्येक पालक हे त्या कुंभारासारखेच असतात. त्यांची मुले समाजात एक चांगली व्यक्ती म्हणून नावा रूपाला यावीत अशी त्यांची इच्छा असते. अशाच विचारांच्या पालकांच्या घरी माझा जन्म झाला हे अहो भाग्यच! आई आणि वडील दोघेही सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या घरातून मोठे झालेले असल्याने 'माणसे जोडणे' हेच ते शिकले होते आणि आम्हालाही त्यांनी ते शिकवले.
अनेक चाचण्यांमधून यशस्वीपणे पार झाल्यानंतरच कधीतरी कानावर कौतुकाचे बोल आणि पाठीवर मोठ्यांच्या शाबासकीची थाप पडायची आमच्या लहानपणी. त्यामुळे अर्ध्याहळकुंडात हुरळून जाण्याची कधी वेळच आली नाही कुणाला.
निदान माझ्या पिढीपर्यंत तरी 'अतिलाड केले किंवा अती कौतुकात वाढवलं तर मुले बिघडतात!' असाच काहीसा समज सगळ्या घरात प्रत्येक पालकांचा होता त्यामुळे स्वतःच्या घरातच नाही तर कॉलनीतल्या कोणत्याही घरी किंवा मैत्रिणींच्या घरी असलो किंवा सुट्टीत नातेवाईकांकडे गेलो तरी कुठेच हा भेदभाव नसायचा. प्रत्येक जण आम्हाला स्वतःचे लेकरू असल्यासारखं आमचे काही चुकल्यानंतर हक्काने रागवायचा.पुन्हा ती चूक होऊ नये यासाठी विचार करायला ते सगळे शिकवायचे. आम्ही नेमकं काय करणे अपेक्षित आहे? हे कधी कधी सांगितलंही जायचं जे खूप महत्त्वाचं होतं.
'मी केलेल्या चांगल्या कामाचं ज्यावेळी कौतुक होत गेलं' तेव्हा हे पक्कं मनाशी समजून चुकले होते की, "जे करायचं ते फक्त चांगलं आणि चांगलंच करायच!" 'चांगल्या गोष्टीचं कौतुक झालं की माणूस ती गोष्ट पुन्हा पुन्हा करतो!' हा मानसशास्त्र विषयातील पाठ माझ्या स्वतःच्या पालकांनी आणि मला स्वत:ची मुलगी मानत माझ्यावर त्यांचा प्रेमाचा हक्क समजणाऱ्या माझ्या इतर अनेक स्वघोषित पालकांनी मला त्यांच्या कृतीतून नकळत शिकवला, जो पुढे मला माझ्या मुलाला घडवत असताना खूप कामी आला.
आयुष्यात मनावर पहिली छाप पडली ती आजीच्या विचारांची! तिला शिक्षणाचं खूप महत्त्व होतं आणि व्यावहारिक ज्ञानाला आणि घरगुती कामाला ती बरोबरीच महत्त्व देणारी होती. कष्टाचे महत्त्व तिने स्वतःचे सगळ आयुष्य तसे जगून समजावले होते. ज्या काळात मुली घरात फक्त चूल आणि मूल सांभाळायच्या त्या काळात बाल विवाह झाल्या नंतरही शिकून ती नर्स झाली.
तिच्यापेक्षा लहान असो वा मोठ्या, सगळ्याच भावंडांचा ती कायम आधार बनली. आजीची शिक्षण न घेतलेली किंवा कमी शिकलेली इतर भावंड जेव्हा आर्थिक आणि इतरही बाबतीत तिच्यावर शेवट पर्यंत अवलंबून असलेली मी पाहिली, तेव्हा कुठेतरी ज्ञानाचे, शिक्षणाचे महत्व अगदी लहान वयातच मनावर नकळत कोरले गेले. त्यामुळे अभ्यासात कधी मागे राहण्याचा प्रश्नच उरला नाही.
आजी सोबत मला खुप लहानपणीच दवाखाना जवळून बघण्याचा योग आला. ती करत होती ती सेवा आणि नोकरीतले कर्तव्य बघून अनेकदा तिचे कौतुक होत असे. पण तरीही सरकारी दवाखान्यातले वातावरण आणि अनेकांना तिथे जखमी किंवा आजारी असताना, वेदनेत येताना पाहून मी खूपदा रडले. पेशंट सोबत त्याची ड्रेसींग होत असताना कधी पेशंट ओरडला की मी ही त्याला साथ दिली. ती कदाचीत त्यावेळी माझ्या बाल मनाला सुचलेली पद्धत असावी हे सांगण्याची की, "मलाही तुमचा त्रास बघून त्रास होतोय!"
याचा परिणाम जो झाला तो योग्य की अयोग्य हे कळण्याइतक शहाणपण किंवा मोठ वय नव्हत माझं, तरी एक ठरवून टाकल होत अगदी पक्कं की, "मी मोठी होवून हे काम करणार नाही!"
तेंव्हा यासाठी शिकून डॉक्टर होतात हेही माहित नव्हते आणि त्यासाठी आधी शाळा काय असते समजायला तो पर्यंत मी शाळेतही गेलेले नव्हते. तो माझा निर्णय मी मोठी झाले तरी बदलला नाही. वडील नाराज होते मी मेडिकलला गेले नाही म्हणून! पण माझा नाईलाज होता.
मी त्यांना खुप प्रयत्न करून शेवटी एकदाच सांगू शकले की, "कुणाला साध खरचटल तरी डोळे गच्च मिटून घेणारी मी पेशंट कसा नीट करेल? खुप खराब चालेल माझी प्रैक्टिस. इतका खर्च करुन तुम्ही मला मेडिकलला पाठवावे अशी आपली आर्थिक बाजू फार चांगलीही नाही ! त्यापेक्षा मी PhD करुन माझ्या नावापुढे डॉ. लावून दाखवेल, पण मेडिकलला जाणार नाही !"
अकरावी आणि बारावी सायन्स करताना माझी आणि वडिलांची याबद्दल झालेली चर्चा कधी कधी वाढून त्यानी नाराज होण्यात बदलायची. शेवटी त्यांनी हार मानली कारण बायोलॉजीच दर आठवड्याला प्रैक्टिकल झाले की मी दोन दिवस उपाशी असायचे ! काहीही खायला बसले तरी माझ्या डोळ्यासमोर डिसेकशन ट्रे यायचा आणि खाल्लेले उलटून पडायचे. मेडिकलच्या शिक्षणाच्या खर्चा पेक्षा त्यावेळी होणारा औषधाचा खर्च आणि त्यांच्या रजा वाढल्या असाव्यात आणि त्यामुळे मग माझी त्यातून सुटका झाली.
अकरावी, बारावीतली सायन्सचे दोन वर्ष आणि मेडिकल कॉलेजमध्ये ऐडमिशन घेणे हया दोन विषयातून एकदाची माझी सुटका झाली, त्यावेळी मला अगदी 'आगऱ्याहुन सुटका' झाल्यावर शिवाजी महाराजांना कसे वाटले असेल याचा अंदाज आला.
माझ्या शैक्षणिक कारकिर्दीतली ही दोन वर्षे सोडली तर अगदी पहिली पासून आजही जे शिकले ते आवडीने! जिद्दीने!! सुदैवाने अभ्यासाची आवड असल्यामुळे शाळा आणि कॉलेज मधे असताना चांगले मार्क मिळत गेले आणि मेरीट मध्ये नाव झळकत राहिले.
मला अभ्यास करणे नेहमीच आवडत असे आणि त्यातून उठवले की जशी तेंव्हा चिडत होते तशीच आजही चिडते. सगळी कामे करुन, इतरांसाठी असलेल्या जबाबदाऱ्या पुर्ण करूनच मला निवांत बसून अभ्यास करायला किंवा वाचायला आजही आवडते, म्हणजे कोणी मधे उठवत नाही. लहानपणी खूपदा मी आमच्या कौलरु घराच्या कौलावर चढून अभ्यास करायचे कोणी मधेच कामाला बोलवू नाही आणि टिव्ही च्या आवाजाचा अभ्यासात त्रास होवू नये म्हणून.
आम्ही तीन भावंड. दोघी बहिणी आणि तिघांमधे बराच लहान असलेला भाऊ. वडील नेहमीच अभ्यासाच्या बाबतीत कडक राहिले. इंग्रजी हा त्यांचा आवडता विषय होता आणि स्वकष्टाने ते ती भाषा शिकण्याचा प्रयन्त करायचे. घराच्या दारांवर ते आमच्या साठी शब्दांचे स्पेलींग आणि अर्थ खडूने लिहून जात आणि रात्री घरी आले की विचारत. आज त्यांच्या त्या मेहनतीचे फळ जागोजागी मिळत आहे. अथवा मराठी माध्यमातून शिक्षण झालेले असले तरी इंग्रजीची आवड निर्माण झाली आणि शिकावे वाटले ते त्यांची इच्छा पुर्ण करण्यासाठी !
इंग्रजी शिकण्याची सुरुवात मात्र मार खाऊन झाली. मी दुसरीत आणि बहीण तिसरीत होतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत मामे भाऊ आला होता, तो चौथीत होता! त्यावेळी चौथीत इंग्रजी विषयात A,B,C,D शिकवली जायची आणि शाळेत पाचवीत तो विषय शब्द आणि पुढचा प्रवास करत वाढत जायचा.
ऑफिसला जाताना वडील भावाला कागदावर चार स्पेलींग लिहून आणि एक वाक्य त्याला तोंडीच सांगून ते वाक्य लगेच कागदावर लिही सांगून गेले. आम्ही सगळ्यांनी ते स्पेलींग पाठ करुन ठेवावे ही त्यांची इच्छा होतो. दिवसभर मदर, फादर, ब्रदर आणि सिस्टर हे चार शब्द स्पेलींग, आणि अर्थ पाठ झाल्यावर मी जे वाक्यं पाठ करायचे तेही भावाला विचारले आणि पाठ करुन वडील येण्याची वाट पाहत थांबले. त्या दोघांनी एक, दोन शब्द पाठ करुन ठेवले आणि मग ते खेळून आले.
रात्री जेवणाआधी वडील आणि आम्ही तिघे त्यांच्या भोवताली मांडी घालून बसलो. मी अगदी जवळ होते. वडीलांनी स्पेलींग विचारायला सुरूवात केली भावापासून. नंतर बहीण, मग मी! एक शब्द बरोबर आला. दुसरा मला विचारला आणि मग त्या दोघांना. सगळे शब्द बरोबर आले त्यामूळे मी खुश की शाबासकी मिळेल कारण त्या दोघांनी पहिला शब्द सांगून दुसरे स्पेलींग सांगताना बराच वेळ घेतला आणि का नाही घेणार? ब्रदरचे स्पेलिंग पाठ न करता कौलावर छापलेले होते कंपनी नावासोबत तिथे मान वर करून, आठवत असल्याचा आव आणत सांगून झाले होते. यात गेलेला वेळ आणि बाकी दोन शब्द त्या दोघांनी पाठ न केल्याने वडील रागवले होते.
मोर्चा माझ्याकडे अपेक्षेने वळवत त्यांनी 'माझे नाव काय आहे?' हे वाक्य इग्रंजीत कसे म्हणशील?" हे विचारले आणि मी ज्या जोशात उत्तर दिले तितक्याच जोरात मला एक चापट खनकन गालावर बसली. पाच बोटे गालावर उमटली आणि डोके बधीर झालं....मारामुळे आणि काय चुकले हे न कळल्याने! मी तेच उत्तर दिले होते जे भावाने कागदावर लिहून ठेवले "माझे नाव काय ? = व्हाट इज माय नाम?" 'नेम ला नाम’ लिहिल्याने सगळा घोटाळा झाला आणि तो मला महागात पडला. खुप वाईट वाटले पण उपयोग झाला नाही. त्यातून एकच शिकले,
"मेहनतीला पर्याय नाही. शॉर्टकट साथ देत नाही. त्यामुळे जबाबदारी घेवून स्वत:ला घडवा!"
वाचनाची गोडी लागली ती मात्र आईमुळे. तिला वाचनाचे खूप वेड होतं. तिच्यासाठी लायब्ररीतून पुस्तक बदलून आणण्याचे काम माझ्याकडे होते मी सातवी असल्यापासून. माझ्या मनाने मी जे पुस्तक घेऊन येईल ते प्रत्येक पुस्तक ती आवडीने वाचायची. रोज दुपारी कामे आटोपली की पुस्तक वाचन करणे आणि दर दोन दिवसाआड वाचलेल पुस्तकं परत करुन नवीन आणायला ती मला पाठवायची. लायब्ररी घरापासून बरीच दू
र होती. किमान सात-आठ किलोमीटर. एवढ्या लांब सायकलवर जाऊन पुस्तक आणणे कधी कधी शक्य व्हायचे नाही त्यामुळे नंतर मग आम्ही दोन पुस्तकांची फी भरली. त्यात माझा फायदा झाला. बर्याचदा मग मी, मला वाचता येतील अशी पुस्तके तिच्या पुस्तका सोबत आणायला सुरुवात केली. तिच्यामुळे लागलेली ही वाचनाची गोडी इतकी जास्त वाढली होती की माझी दहावीची उन्हाळ्याची सुट्टी मी रोज पुस्तक वाचन करण्यात घालवली. वाचनामुळे जी प्रगल्भता आली याच श्रेय आईला.
अकरावी मधे सायन्स घेतलेले असूनही इंग्लिश आणि संस्कृत विषय शिकवताना कॉलेजचे सर आणि मॅडम ज्या कुठल्या लेखकाचा उल्लेख करतील किंवा पुस्तकाचे नाव सांगतील ते मिळवायचे आणि वाचून काढायचे हाच ध्यास लागला होता. माझा सगळा कल हा कथा, कविता, कादंबऱ्या हे सगळं वाचण्यात, चित्र काढण्यात, नाटकात काम करण्यात, जास्त वाढत गेला. अभ्यासा बरोबर या सगळ्या वाढत गेलेल्या गोष्टी आयुष्य सर्वांगाने परिपूर्ण करण्यात कामी आल्या.
दहावीत असताना मराठी विषय शिकवायला गानू मॅडम होत्या. त्या मराठी विषय खूप सुंदर शिकवत. धडा किंवा कविता शिकवताना त्या लेखकाची आणि कवीची माहिती सांगायच्या आणि त्यांनी लिहिलेल्या इतर पुस्तकांची ओळख करून द्यायच्या त्यामुळे लेखकांबद्दल एक वेगळाच आदर मनात शाळेत असल्यापासून निर्माण झाला होता. त्या मॅडमला सुद्धा वाचनाची खूप आवड होती. त्यामुळे कुठेतरी माझ्या वाचनाला चालना देण्यामध्ये आईसोबत शाळेतील गानू मॅडमचा मोठा सहभाग आहे. मराठी हा विषय देखील त्यांच्यामुळे खूप आवडीचा झाला. त्यांनी माझ्यावर बरीच मेहनत घेतली. मला निबंध लिहायला खूप आवडायचं आणि एकदा लिहायला सुरुवात केली वहीचे चार-पाच पाने मागून-पुढून भरल्या शिवाय मी थांबत नसे. त्यामुळे मराठीचा पेपर कधीही लिहून पूर्ण व्हायचा नाही. अर्धा वेळ आणि मिळालेली अर्धी उत्तर पत्रिका निबंध लिहिण्यात संपून जायची. दहावी मधे चांगले मार्क मिळवायचे असतील तर माझा मराठीचा पेपर वेळेच्या आत पूर्ण व्हावा म्हणून त्यांनी मला दोन नियम सांगितले. एक म्हणजे मी निबंध सगळ्यात शेवटी लिहायचा आणि दुसरा म्हणजे रोज घड्याळात वेळ लावून एक निबंध लिहायचा आणि पाच सात मिनिट झाले की लिहिणे थांबवायचे. दुसऱ्या दिवशी ती वही त्यांना तपासायला द्यायची. ज्यामुळे माझी लिखाणाची हौस पूर्ण होईल आणि मला स्पीडने लिहिण्याची सवय लागेल. वेळेचा अंदाज घेता येईल. पूर्ण वर्षभर त्यांनी माझ्यावर जी मेहनत घेतली ती माझ्या लिखाणाची पहिली सुरुवात होती, माझ्याही नकळत झालेली. या गोष्टीसाठी मी गानू मॅडमच्या सदैव ऋणात राहील.
शाळेतल्या आणखीन एक शिक्षिका ज्यांनी मला सदैव त्यांच्या मूली प्रमाणेच मानले त्या चित्रलेखा मेढेकर! चित्रकला हा विषय शिकवता - शिकवता सतत हसतमुख राहून आयुष्यात रंग भरणे त्यांनी शिकवले. आजही त्यांच्याकडे पाहिले की अगदी प्रसन्न वाटावं असं व्यक्तिमत्त्व आहे त्यांच. पाचवी ते दहावी सहा वर्षांचा काळ, नंतरही आजवर ते प्रेम आणि माया तशीच टिकून आहे. त्यांच्यासोबत चित्रकलेचे धडे शिकत, अनेक परीक्षा आणि स्पर्धांना गाजवण्यात स्वतःसाठी आणि शाळेसाठी अनेक ढाली, मेडल्स व सर्टिफिकेट मिळवण्यात शाळा कधी आणि कशी संपली, ते कळलेच नाही. चित्रकला , रांगोळी किंवा ग्रीटिंग कार्ड यापैकी कुठल्याही स्पर्धेसाठी किंवा परीक्षेला शाळेतर्फे माझे नाव त्या सतत पाठवत राहिल्या. अनेकदा त्यांनी फी देखील भरली असेल. कधी कळू दिले नाही किंवा कधी स्पर्धेला तुझे नाव पाठवू का? हे विचारुन औपचारिकता ठेवली नाही इतकं हे नातं जवळच होतं आणि आहे. आज माझ्याकडे याविषयीची जी काही
प्रमाणपत्रे किंवा बक्षिसे आहेत ती केवळ त्यांच्यामुळे! माझ्या चित्रांचा प्रवास चित्रकलेच्या वही पासून ते थेट 'ऑल इंडिया ऑफ जपान असोसिएशन ' यांनी जपानमधे भरवलेल्या चित्रप्रदर्शना पर्यंत झाला तो केवळ मेढेकर मॅडम मुळे! पुढे पेंटिंग चे विविध प्रकारही जेव्हा शिकत गेले त्यावेळी त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
चित्रकलेच्या या प्रवासात
आणखी एक नाव घेईल मी आज ते आहे संगीता रोंघे या मैडमचे. त्या सुद्धा चित्रलेखा मेढेकर यांच्या विदयार्थिनी आणि नंतर शाळेत
चित्रकलेच्या शिक्षिका म्हणून आल्या होत्या. त्या नेहमी मेढेकर मैडमचा आदर करत आणि आम्हाला आणि खास करून मला खुप जीव लावत. कौतुक करत. आजही त्या संपर्कात आहेत आणि त्यांनी नंबर शोधून फोन केला त्यावेळी तर मन खुप भरून आले. आज
त्यांचेही आभार.
माझे अक्षर छान असावे यासाठी जर कोणी मला सुचवले असेल तर त्या दोन व्यक्तींमध्ये देखील एक नाव मेढेकर मॅडमचे आहे. माझ्या वडीलांचे अक्षर खूप सुंदर होते. लहानपणी आमच्या पुस्तकांवर स्केचपेनने त्यांच्या छान अक्षरात ते नाव टाकून देतं आणि प्रत्येक वेळी लिहिताना हेच म्हणत कि, " तुम्ही लहान आहात म्हणून हे लिहीत आहे. तुमच अक्षर छान करा आणि मग स्वतःच्या चांगल्या अक्षरात नाव टाकत जा." हीच गोष्ट मेढेकर मॅडमनी शिकवली त्यांच्या पद्धतीने. "तुम्ही जर समोर ठेवलेली वस्तू हुबेहुब काढू शकता तर मग पुस्तकात असते तसे सुंदर अक्षर का नाही? खास करून एका कलाकाराचे अक्षर हे छानच असावे. ड्रॉइंग खूप सुंदर काढणाऱ्या व्यक्तीचे अक्षर नेहमी चांगलं असावं. आपल्या अक्षरावरून देखील लोक आपलं मन ओळखतात." हे एकदा त्या वर्गात शिकवत असताना बोलून गेल्या, ते खूप पटलं. आज माझं अक्षर चांगला आहे त्यासाठी देखील मी माझ्या वडिलांसोबत त्याचं श्रेय मेंढेकर मॅडम ला देईल.
शाळेत असताना निबंध लिहितांना लागलेली, काहीतरी सुचलेलं लिहिण्याची सवय कॉलेजमध्ये आणखी वाढली. कारण वाचनही वाढले होते. वर्षा देशपांडे नावाच्या माझ्या एका मैत्रिणीच्या वडिलांचा पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय होता. खूप पुस्तके होती त्यांच्या घरी. तो सगळा खजिना त्यांनी आमच्या साठी मोकळा ठेवला. त्या विजय देशपांडे काकांचे ही आज मनापासून आभार. त्यांच्या दोन्ही मुली वर्षा, वृंदा आणि मी कित्येक तास चारी बाजूंनी पुस्तकांचे ढीग असलेल्या खोलीत बसून पुस्तके वाचायचो. त्यावर चर्चाही करायचो. काका आवर्जून विचारायचे, आज काय वाचलं ? मी आणि त्यांच्या लहान्या मुलीने म्हणजे वृंदा देशपांडे ने त्याकाळात आम्हाला जमतील तशा कविता लिहायला तेंव्हा सुरुवात केली होती आणि त्या कविता वाचून आम्हाला प्रोत्साहन देणारे ते काका होते. त्यांच्या घरी गेलं की त्यांचा एकच प्रश्न असायचा, माझ्या वर्षाने खूप सुंदर चित्र काढले आहे. तू किती चित्रं काढली? आणि माझ्या वृंदाने कालच एक नवीन कविता लिहिली. तू कधी लिहिलीस? कोणती लिहिली ? त्यांचं हे सतत विचारणं आम्हाला तिघींना सतत क्रिएटिव्ह गोष्टीत बांधून ठेवत गेलं आणि एकमेकांचे उदाहरण देऊन स्पर्धा न करता प्रोत्साहन कसं देता येत हे मी त्या काकां कडून शिकले. कित्येक वेळा 'बी रघुनाथ काव्यसंध्येला' मी त्या सगळ्यांसोबत जायचे दरवर्षी पाच सप्टेंबरला. त्यानिमित्ताने अनेक कवींना त्यांच्या कविता सादर करताना जवळून बघण्याचा, त्यांना भेटण्याचा खूप मोठा योग माझ्या आयुष्यात आला तो केवळ या तिघांमुळे. त्यासाठी त्यांचे मनापासून आभार.
शाळेतल्या आणखीन एक मॅडम क्रांती डांगे ज्या याच मैत्रिणीच्या वर्षाच्या दूरवर नात्यातही होत्या त्यांचं आणि माझं नातं त्यांनी नेहमीच मैत्रिणी सारखं ठेवलं. वयाने त्या खूप लहान होत्या इतर शिक्षकांपेक्षा. बीएड साठी लेसन घ्यायला त्या वर्गावर आल्या होत्या आणि त्यानंतर आमच्या शाळेतच त्यांना नोकरी देखील लागली. आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी ही होत्या त्या. एकदा शाळेच्या ट्रीप मधून येताना त्यांच्याशी खूप गप्पा झाल्या. मैत्री वाढली. 'व. पु. काळे' ह्या लेखकाच्या नावाची ओळख झाली ती त्यांच्यामुळे. माझ्या आवडत्या अनेक लेखकांमध्ये एक नाव ज्यांचे आहे ते म्हणजे व.पू. काळे! सुरुवातीला मॅडमचे आवडते लेखक म्हणून त्यांची पुस्तके वाचायला सुरुवात केली आणि नंतर मी त्यांच्या लिखाणाच्या प्रेमात पडले. कदाचित व.पु. काळे यांची अगदी मोजकीच पुस्तके असतील जी मला मिळालीच नाहीत म्हणून वाचनात आली नाही. ट्रीप मध्ये जशी मॅडमनी या लेखकाशी माझी ओळख करून दिली तसेच त्यांनी माझी ओळख करून दिली होती आकाशवाणी या प्रसारमाध्यमाशी !! त्या मॅडमचा आवाज खूप छान होता. त्या खूप छान गाणं गायच्या. आकाशवाणीवर कॉन्ट्रॅक्ट बेसवर अधून मधून निवेदन पण करायच्या. हे सगळं त्यांनी मला शेअर केलं आणि त्यावेळी मला विचारलं की, "जुन्या गाण्याची फर्माईश हा कार्यक्रम निवेदन करताना मी तुझे नाव घेतले तर चालेल का तुझ्या घरी?" मी "हो" म्हणाले आणि आवर्जून तो कार्यक्रम ऐकला. स्वतःचं नाव गाण्याची मागणी करणाऱ्यांच्या यादीत ऐकून सुद्धा इतकं छान वाटलं होतं की, मनात एक विचार येऊन गेला... अशा पद्धतीने एक दोन वेळा नाव येण्यापेक्षा आकाशवाणी वर माझ नाव सतत येत राहील असं काही करता येईल का ? त्यासाठी त्या मॅडम कडून मार्गदर्शन घेतले आणि पुढे दोन वर्षातच आकाशवाणीची ड्रामा ऑडिशन टेस्ट पास झाले. आकाशवाणीवर स्वतःच्या लिहिलेल्या कवितांचे सादरीकरण आणि ड्रामा ऑडीशन पास झाल्यामुळे वेग वेगळ्या नाटकांमध्ये आकाशवाणीवर आणि पुढे रंगमंचावर काम करता आले. आकाशवाणीची सगळी यंत्रणा अगदी जवळून बघितली आणि त्यात थोडं फार स्वतःचं नाव कमवू शकले यासाठी मी कायम क्रांती डांगे या मॅडमच्या ऋणात राहू इच्छिते.
अकरावीत असताना माझ्या ट्युशन मध्ये एक 'रिपल पटेल' नावाची मैत्रीण होती. तिने एक दिवस मी समुद्रावर लिहिलेला परिच्छेद वाचला आणि खूप कौतुक केले. "तू यानंतर लिहित रहा" असे म्हणून. ती देखील अधून मधून मला मी काही लिहिले आहे का? हे विचारायची. आज ती कुठे आहे माहित नाही पण ती जिथे कुठे असेल तिथे तिच्यापर्यंत 'मी लिहीत आहे' हा निरोप सृष्टीने पोहोचवावा. ती अभ्यासात हुशार होती आणि तिला डॉक्टर होण्याची इच्छा होती. ते ती झालीच असेल आणि आनंदात असेल हीच इच्छा.
अकरावीत मी लिहिलेली एक साधी कविता पहिल्यांदा जिच्यामुळे पेपर मध्ये छापून आली त्या माझ्या शाळेपासून आजही असलेल्या मैत्रिणीच्या म्हणजे 'मंजुषा जगताप' हिच्या नावाचा उल्लेख करणे अत्यंत गरजेचे आहे. कुठलीही ओळख नसताना आणि आकाशवाणीवर पोहोचण्याआधी माझी कविता, मंजुषा जगताप हिने एका पेपर मध्ये देऊन छापून आणली होती. तो पेपर तिने कॉलेजमध्ये सर्वांना दाखवला. आपलं नाव पेपर मधे कवितेच्या खाली छापून आलेलं बघण्याचा तो पहिलाच प्रसंग होता. याआधी पेपर मध्ये नाव येत होतं किंवा फोटो येत होता तो चित्रकलेतलं बक्षीस मिळाल्यानंतर. तो पेपर बघून कॉलेजमध्ये इतरांनाही मी कविता लिहिते हे समजले. मंजुषाने मग कॉलेजच्या मॅग्झिन मधे सुद्धा माझी कविता द्यायला लावली. अनेक दिग्गजांच्या कवितांसोबत स्वतःची कविता कॉलेज मॅगझीन मध्ये छापून आलेली पाहिली त्यावेळी 'एक दिवस अख्खं पुस्तक स्वतः लिहिलेलं असावं' ही भावना निर्माण झाली होती. अशी प्रबळ इच्छा जिच्या प्रयत्नांमुळे झाली होती त्या मंजूषाचे ही आज खुप खुप आभार.
मला घडवण्याच्या हया प्रवासात आणखी अनेक नावे आहेत आणि त्यांनी केलेली मदत ही खुप मोलाची आहे. एकच भाग खुप मोठा होत असल्याने आज इथेच थांबते पुन्हा पुढचा भाग लवकर लिहिल या पक्क्या आश्वासना सोबत.
'वाटेवरच्या सावल्या आणि कुंभाराचे हात' या नावाने मला अनेकांना
पत्र लिहून आभार व्यक्त करायचे होते. त्यातील अगदी निवडक नावे जी अंदाजे मी अकरावीत असे पर्यंतची आहेत, त्यांचा इथे उल्लेख केला आहे. त्यातही अजून काही नावांचा उल्लेख राहिला आहे. ज्या सगळ्यांचा उल्लेख या भागात नाही होवू शकला त्यासाठी मी त्यांची क्षमस्व आहे.
आज या सगळ्यांबद्दल लिहू शकले ते ईरा व्यासपीठाने ही स्पर्धा आयोजित केली आणि वेळ वाढवला, यासाठी ईराचे आभार मानून आपली रजा घेते.
* सदर कथा / कविता / लेख याच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त
लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.
सस्नेह नमस्कार