गुरुवर्य / गुरूचे महत्त्व
गुरुवर्य / गुरूचे महत्त्व
जीवनात येणाऱ्या अनंत अडचणी
मनाला खिन्न करतात
संकटाच्या वादळात मनाचा तोल ढासळतो
प्रश्नांच विवर अंधाराने तुडूंब भरते
विवंचनेचा गर्तेत घुसळते
नैराश्याची नांदी
अन् अचानक आठवतो मित्र
आधाराचे रुपात गुरु होतो......
रस्त्यावरून फिरतांना क्षणात वाढतो
पावसाचा जोम
ढग फाटल्यागत येतात पावसाच्या धारा
सगळीकडे धो धो पाऊस
गचकन निघून जाते वीज
अशा वेळी अवकाशात कडकडणारी दामिनी
पथ दीपक बनून मार्ग दाखविते
गुरूच्या आसनावर आरूढ होऊन.......
मुखोद्गत असणारं भक्ती रसातील स्तवन
चंचल मनाल स्थिर व शांत करते
हृदयातून उठतात मुग्ध तरंग
जे देतात नव चैतन्य व आगळं स्थैर्य
तजेले तुषारं बरसत राहतात दिवसभर
जणू स्तवनरुपी गुरूच्या आशिषामुळे .....
रेल्वे स्थानकावर भिक्षा मागणारा भिकारी
नात्याने तो आपला कोणीही नसतो
परंतू कधीकाळी खेडूताला तोही सांगतो
लोकलच्या प्लॅटफार्मचा नंबर
विचारले असता त्याशी चौकशी करतांना
असा भिक्षुकही गुरुचे स्थान भुषवितो.......
आयुष्याच्या वळणावर दीपस्तंभ म्हणून
जेव्हा चल अचल उभे ठाकतात गुरूच्या रूपात
तेव्हा सुकर होतो जीवनाचा प्रवास
म्हणूनच गुरूला ब्रम्हं विष्णू महेश संबोधतात
जे बनतात पदोपदी अंधारातले दूत
साऱ्या अर्थांनी साक्षात देवा सारखे.....
