गुरु माऊली
गुरु माऊली
बालपणी मज हात धरुनी, चालाया शिकवलेस तू।
बोबडे मी बोल बोलता, शुद्ध करुनी दाखवले तू॥
बोट धरुनी शाळेमध्ये, दाखल मजला केले तू।
अभ्यासातील चुका सुधारून, प्रगतीपथावर नेले तू॥
श्लोक, परवचा, पाढे म्हणता, साथ मजला दिलीस तू।
संस्कृतीचा दीप देऊन हाती, सुसंस्कृत मज केले तू॥
तारुण्याच्या उंबरठ्यावर बोट मोकळे सोडलेस तू।
परी नजर घारीची ठेवून माझे संरक्षण नित केले तू॥
संसाराच्या सारीपाटावर बुद्धीबळ शिकवलास तू।
प्रेमभावे जिंकून सर्वा, सासरी सन्मान मिळवून दिलास तू॥
आई होता मम कन्येची, वात्सल्यमंत्र मज दिलास तू।
माता कशी असावी जगती, प्रात्यक्षिक मज दिलेस तू॥
नाही संपले शिक्षण माझे, मृत्यूलोकी जरी गेलीस तू।
मृत्यू असावा सुंदर किती ते, उदाहरण मज दाविशी तू॥
"गुरु-माऊली" गुरूस म्हणती; माऊली, मम "गुरू"च तू।
जन्म दिला मज ज्या देवाने, त्या देवाचे स्वरूप तू॥
