ग्रामीण जीवन
ग्रामीण जीवन
भल्या पहाटे माय उठते कोंबड्याच्या बांगेने
सडा सारवण करते गायीच्या शेणाने
कलाकुसरीची रांगोळी मायेच्या हाताने
जात्यावर दळते दळणं ओवीच्या गाथेने
विहिरीचं पाणी सरसर ओढून
माय न्याहारीची करते तैयारी
बा गेला सकाळीच नांगर घेऊन शेतात
मायच्या डोईवर विळी आणि शिदोरी
गावाच्या पाणवठ्यावर धोबीगाठ भरते
गावात असलेल्या समस्या इथेच बरं कळते
दूध लोणी तांकांनी गाव दुधदुभत्यात न्हाते
नवीन माहिती साठी दवंडी पिटते
पशुधन घरची असते संपत्ती
अन्नात असतो सर्वांचा वाटा
किलबिल गाणी पाखरांची
चावडीवर अवीट गोडवा
सणासुदीच्या दिवशी
जय्यत तैयारी मेजवानीची
नवीन कपडे सणासुदीला
बाळगोपाळ गाती गाणी रानाची
गावं जरी गरीब असतं
अन्न धांन्याला कमी नसतं
राहतात गावकरी गुण्यागोविंदाने
प्रेमाला उणे नसतं
कमी गरजा साधे जीवन
आजाराला थारा नसते
शंभरी गाठतात गावकरी
सहज सुलभ अंतरीच्या प्रेमाने
जरी असतील अडाणी, जीवन पाठात श्रेष्ठ
गणकाची गरज नाही तोंडपाठ गणित असते
माणूस हीच ओळख असते पुरेशी
काट्याकुट्यात तरणीबांड पहेलवानी फुलते
हिरवेकंच रानमाळ, हिरवी जरी चोहीकडे
प्रदूषणचा प्रादुर्भाव नाही प्राणवायू सर्विकडे
सुगंधित गाव अत्तराचा सुवास गावभर
द्वेषाचा कलंक ना गावाला माणुसकी नांदते मनभर
