गावाकडची संस्कृती
गावाकडची संस्कृती
गाव जपतं आहे, परंपरा आणि संस्कृती।
ही दंतकथा खरी, की सत्य हे, की गावात वाढते आहे विकृती?॥
गावामधल्या तरुणांना शहरी संस्कृतीची लागली ओढ।
फिल्मी कपडे आणि फिल्मी डायलाॅग , ह्यातच त्यांची लागते चढाओढ॥
प्रेम करायचे तेही "आर्ची "सारखे "सैराट" होऊन।
सिनेमातल्या धर्तीवरच लग्न करायचे पळून जाऊन॥
मग आयुष्याची पेटली होळी, तरी नाही पर्वा त्यांना।
तिथे कोण देतंय थारा, संस्कृती आणि परंपरांना!!॥
गाव विकसित होत आहे; रस्ते, रेल्वे, पोहचत आहे।
पण अजूनही गावात "नरबळी " पडतच आहे॥
भानामती, जादूटोणा, ह्याच जुन्या परंपरा।
कुठे गेले " वासुदेव", अन् भूपाळीची संगीतधारा?॥
शेतामधली " भाऊबंदकी" , बांधावरचे तोडे देऊळ।
पहाटेच्या त्या आरतीसाठी, भक्तांवाचून रिते राऊळ॥
परंपरेच्या नावाखाली गावामध्ये छळ सूनेचा।
संस्कृतीचा अतिरेक तो,विध्वंस करतो गावाचा॥
