गाव माझा
गाव माझा
झुंजूमुंजू होताच गावी
वाजतो आडाचा रहाट
लगबग ती पाण्यासाठी
होते प्रसन्न अशी पहाट
काकड आरतीचा रव
घणघण घंटेचाच नाद
निघे पाखरांचा मंजुळ
घरट्यात गोड पडसाद
गाय हंबरतेय गोठ्यात
हुंदडे वासरू देती ढुशा
कोकिळेचे गोड कुजन
घुमतोय नाद दाही दिशा
आम्रवृक्षवृक्षांवर घमघम
येतो मोहरांचा हा सुवास
अंगणीचे तुळशीवृंदावन
उभे स्वागताला सुहास्य
नंदादीप ठेवता वृंदावनी
मंद तेवते त्याची ज्योत
परसातूनही गंधाळलेला
घुमतोय धुंदीत चक्रवात
जात्यावरच्या ओव्यांमधुनी
कंकणाची होई किणकिण
मंदिरातल्या सायंआरतीस
असते घंटानादाची घणघण
नदी वाहते झुळझुळ इथे
झरे शुभ्रस्फटिक जलाचे
बळीराजा हा पिकवितो
पीकधान्य पोलादी बलाचे
