एका कळीची गोष्ट
एका कळीची गोष्ट
एका बागेत एक कळी उमलली होती
ह्या जन्माच्या हर्षाने आनंदाने डोलत होती!!
येणाऱ्या जीवनाच्या खेळाशी ती अपरिचित होती!
जीवनाची व्याख्या करायचा ती कसोशीने प्रयत्न करत होती!
काही दिवसात तिच्या वाट्याला येणाऱ्या दुःखाने ती खंगली!!
काट्याकुट्यात राहूनही ती मात्र तिचे दुःख हसत सहन करायची!
वाऱ्याच्या झुळकेने डोलायची
अन पावसाच्या थेंबाने खुलायची !
काट्याकुट्यातील जीवनाचा तिला झाला होता परीपाठ ! !
तिच रात्र आणि तीच पहाट
तोच डोळ्याचा ओला काठ!
एक दिवस माझ्या रेशमी साडीचा जरजरीत काठाचा थरथरणार पदर
तिला स्पर्शून गेला आणि हळूच दुःख मला कानात सांगून गेला !!
आता तिचे आणि माझे खुप अबोल संबंध आहे,
नव्हे ती कळी म्हणजे मीच आहे!!
एक दिवस एक अनामिक , एक पांथस्थ त्या कळी जवळ आला,
त्या कळीच्या सौंदर्याला न्याहाळू लागला,
कळीलाही मन असतं हे त्यानं जाणलं,
तिचे अश्रू त्याने ओंजळीत घेतले, तिच्यात तो तल्लीन झाला!!
अचानक दूरवर होणाऱ्या घंटा नादाने तो स्थिरावला ,
हळूच त्याने त्या कळीला त्या काटेरी झुडपातून बाजूला केले,
अलगद आपल्या ओंजळीत घेतले
मंदिराच्या दिशेने गेला ,
आणि "श्री " चरणावर वाहिले
त्या कळीचे दुःख आता कमी झाले होते,
मन समाधानी झाले होते,
कारण आता
तिचे अस्तित्व संपले तरी तिचे रूपांतर कचऱ्यात होणार नव्हते ,
तिचे रूपांतर होणार होते ते फक्त निर्माल्यात आणि निर्माल्यातच!!!!
