एक सर मला म्हणाली...
एक सर मला म्हणाली...
धरणीला सहस्त्र हातांनी कवटाळणाऱ्या नभातून
बरसणारी एक सर मला म्हणाली,
इतकी गं काय स्वतःमध्ये गुरफटलीस?
इतकी गं काय तुझ्या विश्वात विसावलीस?
तुझ्या चार कोनी विश्वातून जराशी बाहेर ये....
तुझ्यातल्या अल्लडपणाचा एकदा तरी अनुभव घे...
माझ्या अंगणात बरसणारी सर काही काळ कुजबुजली..
माझ्यातल्या अल्लडपणाचा हलकेच कानोसा घेऊन गेली..
ही बरसणारी सर मला बरंच काही सांगून गेली..
तिचे शब्द ऐकून दडपलेला एक आवाज
हलकेच कानाशी आला..
पावसाच्या गूढ सांग्रसंगीताचा स्वर
मनाशी एकरूप झाला..
एका अनामिक ओढीने ही सर
सृष्टीला सर्वस्वी आलिंगन देते..
हिरव्या सोहळ्याच्या सुखद सुरुवातीने
सृष्टी भेटीच्या क्षणासाठी आतुर होते..
कधी काळी दडपलेला माझ्या मनाचा नाजूक कोपरा
आज कुठे जाणवला..
त्या एका सरीने तर माझ्यातला अल्लडपणा
प्रेमानं भिजवला..
या मोहक भावना माझ्यात ओतणारी सर
नकळत बरसून गेली..
माझ्या मनाच्या नाजूक कोपऱ्यातली घागर
तुडुंब भरली गेली, अगदी कायमची....
