STORYMIRROR

vanita shinde

Others

4  

vanita shinde

Others

एक अनामिक भिती

एक अनामिक भिती

1 min
497

*एक अनामिक भिती*


पहाटं दिवस उगवल्यापासून 

असायचं सुरु रहाटघाडगं,

दिनक्रम चालू तिचा भरायला

टिचभर पोटाचं रितं खळगं.


रक्ताचं पाणी करुन झिजून मरायची,

दिसभर घाम गाळून दमून जायची.

कामाच्या नादात दु:ख विसरायची,

रात्र होता हृदयी धडधड वाढायची.


अंधा-या रातीला भितीचं सावट

नकळत तिच्या पुढं यायंच,

जीव घाबरून अंगात उरलेलं

सारं अवसानच गळून जायचं.


दारुच्या भुतानं झपाटलेला नवरा

धडपडत घरापर्यंत पोहोचायचा,

मारहाण,शिवीगाळ नुसतं थैमान 

अंगात वारं शिरल्यागत घालायचा.


त्याचं ते पिसाटलेलं रुप पाहून

भेदरलेलं मन गांगरुन जायचं,

पोटात गोळा येत काळीज

पिळवटून थरथरू लागायचं.


मग भितीनं पाय लटपटायचं

अंगाला घाम फुटून लोट वहायचं,

सारं जग फक्त तमाशा बघायचं

दोघांच्या भांडणात कोण पडायचं?


नव-याच्या व्यसनी वृत्तीनं सारा 

संसार विस्कटून वाटोळं व्हायचं,

पोखरलेलं भविष्य कसं सावरायचं

या अनामिक भितीनं मन जळायचं.


Rate this content
Log in