दुष्काळाच्या झळा
दुष्काळाच्या झळा
1 min
323
उसवलं सारं जीणंं
दाणा दाणा शोधताना
बाप उपाशी झोपला
घरदार मोडताना ॥1॥
गुराढोरांची दावण
सारी फिरे रानोमाळ
नाही कुणी ना कुणाचं
आला सैतानी हो काळ ॥2॥
असा अस्मानी दुष्काळ
झाला खाली गाव सारा
पै पाहुणे भी बेजार
नाही कुणाचा हो थारा ॥3॥
गाई गुरांच्या गोठ्यात
बाप पाहिला रडताना
उभा दिसला इट्टल
त्याच्या पाया हो पडताना ॥4॥
असे उन्हाचे चटके
अनवाणी चाले माय
आमची हयात रचिता
तिचे भेगाळले पाय ॥5॥
आज आठवती साऱ्या
अशा दुष्काळाच्या झळा
जिणं माय न बापाचं
लागी जीवाला हो कळा ॥6॥
