दुष्काळ एक समस्या
दुष्काळ एक समस्या
भेगाळल्या भुईपरी
मुकी सृष्टी भेगाळली
निसर्गाच्या र्हासापायी
नभापरी ढगाळली।।१।।
उभ्या उन्हात पोळून
दाह शरीराचा होतो
सर्जा-राजा,चुकीपायी
झळा दुष्काळी साहतो।।२।।
मानवाच्या हट्टापायी
हिरवळ नष्ट झाली
मुक्या जीवाच्या नशीबी
परवड सारी आली।।३।।
काय त्या जीवांचा गुन्हा
जगतांना इथं झाला?
दुष्काळाच्या झळांनीच
देह पोळून निघाला।।४।।
दृष्टावून गेला गड्या
प्रश्न माझ्याही प
ोटाचा
तुझ्या चुकीचा फटका
घात करतो आमचा।।५।।
दुष्काळाच्या सावलीनं
मुका जीवही पोळला
तुझ्यापरी नाही आम्हां
मुखी वाचा बोलायला।।६।।
अरे माणसा तुझा रे
आतातरी हट्ट सोड
एक रोपटं लावून
नातं निसर्गाशी जोड।।७।।
नातं जोडता नव्याने
दिस येतील सुखाचे
नव्या वर्तनाने तुझ्या
दिस हरती दुःखाचे।।८ ।।
चुकी होते सर्वाठायी
जाण ठेवावी जराशी
मित्रापरी वागावे तू
आतातरी निसर्गाशी।।९।।