दुरावलेपण
दुरावलेपण
दुरावलेपण
कुणीही कुणाला विचारलं आताशा
"कसं चालललंय तुमचं "तर उत्तर मिळतं
"एकदम मस्त "
पण खरंच का प्रत्येकाचं
असतं अगदी मस्त चाललेलं?
कधीचं नसतं का कुणाच्याही मनात
शल्य दुसऱ्याला सांगावं असं?
नसतो का राग कधी ओठांवर
भडाभडा ओकून टाकावा असा?
नसतात का प्रकृती अस्वास्थ्याची कारणे,
अधुनमधून मनाला अस्वस्थ करत?
की परिस्थिती नेहमीच असते समाधानकारक
की कधीच मारावे लागतं नाहीत हातपाय तरंगून राहण्यासाठी पाण्यावर?
मग हे मस्त काय असतं?
कधी कुणाशी बोलू नये मनातलं
अशी निर्वीकार आणि तटस्थ झालीत का नाती?
की कोणत्याही परिस्थितीत नाहीच घायची दुसऱ्याची मदत
अशी स्वयंपूर्ण झालीत ती?
इतकं का आलं हे दुरावलेपण की
असूया आणि स्पर्धा
आयुष्याची अविभाज्य भाग झालीत,
आणि मीच असावं पुढे
ही भावना टोकाची झाली.
वीणा विश्वास चव्हाण
