उद्रेक
उद्रेक
कधी ना कधी
उद्रेक व्हायलाच पाहिजे होता ना?
असहाय्य आणि हतबल होऊन निपचित पडलेल्या
समाजपुरुषाचा उद्रेक
व्हायलाच पाहिजे होता ना?
पापभिरू आणि न्यायाची चाड असणारा हा समाजपुरुष
जगण्यातले अनेक अपमान आणि अन्याय सहन करत
अगदी निचेष्ट झाला होता
चिमूरडीपासून जख्खड म्हाताऱ्या स्त्रियांच्या
स्त्रीत्वावर घाला घालत कुकर्म करत राहणाऱ्यांना
कधीतरी शिक्षा होईल
पीडीतांना अन्यायाविरोधात
कधीतरी न्याय मिळेल म्हणून
वाट बघत होता
पण वर्षें वर्षें लोटली तरी
न्यायव्यवस्था ढिम्म
होऊन अजगरासारखी सुस्तावलेली,
तर कुकर्म करणारे बलात्काराला निर्ढावलेले,
अशावेळी उद्रेक व्हायलाच पाहिजे होता ना?
ओठांवरचं दूधही न सुकलेल्या कोवळ्या कळीवरचा घाला बघुन
प्रत्येकाचा उद्रेक व्हायलाच पाहिजे होता ना?
