आता दुधावरच्या सायीला जपायचं आहे
आता दुधावरच्या सायीला जपायचं आहे
1 min
357
माझ्या समोरच चालत होती ती,
त्याच्या छोट्या छोटया पावलांशी
आपली पावलं जुळवत
अगदी हळू हळू,
आणि तो आपल्या चिमुकल्या बोटानीं तिचा हात पकडून
मधे मधे वर बघत,
अखंड बोलत होता.
माझ्या काळजात काहीतरी चमकून गेलं
माझ्या आयुष्याच्या प्रवासातील
ते निरागस बाल्य,
ते छोट्या पावलांबरोबर चालत राहणं,
आता खुप मागे थांबलं होतं.
बाळाबरोबरच जन्माला आलेलं
आमचं पालकत्वही तेव्हा नवीनच होतं
थोडं अल्लड,
थोडं भांबावलेलं,
थोडं जबाबदारीने धास्तावलेलं,
कधी संसाराची प्रश्नचिन्हे
सोडवताना,
कधी आर्थिक गणिते
जुळवताना,
दमलेलं,
कधी त्रस्त झालेलं,
तर कधी पालकत्व अनुभवताना अती आनंदात चिंब भिजलेलं
पण तरीही वाटत राहतं
की काहीतरी सुटून गेलं,
कधी शिकता शिकता
काही चुकून गेलं
कधी काही शिकवता शिकवता चुकून राहुन गेलं
आता वाटतं राहुन गेलेली कसर भरून काढावी,
आता दुधावरच्या सायीला निगुतीने जपत,
पुन्हा बाल्य जोजवावं
कानांनी नुसतं त्यांचं ऐकत राहावं
Time up चं बंधन न घालता
शिस्तीलाच बेशिस्त करत
एक हसरं पालकत्व अनुभवावं.
