STORYMIRROR

Veena Chavan

Others

4  

Veena Chavan

Others

नदी सुकत चालली आहे

नदी सुकत चालली आहे

1 min
336

नदी सुकत चालली आहे 


सुकत चाललं आहे 

तिचं जिवंतपण आणि

मिटत चाललं आहे तिच्या 

खळाळत्या पाण्याचं लयदार गाणं,

डबक्यासारख्या शिल्लक राहिलेल्या पाण्यातून 

दिसत आहे तळ तिच्या 

गूढ, गंभीर ,खोल डोहाचा 

आणि वाहणाऱ्या क्षीण झालेल्या प्रदूषित धारेतून 

तिचं अस्तित्व आता उरलं आहे फक्त नावापुरतं,

मिटत चालल्या आहेत 

तिच्या घनगर्द किनाऱ्यांच्या खुणा 

आणि 

उघड्या पडलेल्या दगड गोट्यातून 

रोडावलेली दिसत आहे तिच्या 

विस्तीर्ण अशा पात्राची भव्यता,

अनेक बंधारे घालून 

ठिकठिकाणी 

अडवला आहे तिच्या पाण्याचा प्रवाह 

तर कुठे अजस्त्र धरण बांधून  

संपुष्टात आणली आहे 

तिची जन्मतःच समुद्राला

जाऊन मिळण्याची अनिवार ओढ 

ती जिवंत नदी,

ते निसर्गाचं एक वाहतं चैतन्य,

मनाला विदीर्ण करत 

असं हळूहळू सुकत चाललं आहे .


वीणा विश्वास चव्हाण


Rate this content
Log in