दरडीखाली विसावला आमुचा गांव
दरडीखाली विसावला आमुचा गांव
निजली होती कुशीत लेकरं, गुदमरला क्षणात श्वास
दगडा सारखा पहात होता लांबून, तो दगडाचा देव
काल रात्री दरडी खाली विसावला आमुचा गांव ||धृ||
दमून भागून आलो होतो, दोन घास जेवलो होतो
टप टप नारा थेंब भयानक अश्रू सारखा रडवून गेला
कसा अचानक झोपेत सुखाच्या साधला काळाने डाव
काल रात्री दरडी खाली विसावला आमुचा गांव ||१||
आई कुणाची, बाप कुणाचा, बहीण अन् भाऊ नेला
हंबरडा फोडून उरला सुरला जीव कासावीस झाला
कुशीत ज्याच्या खेळलो, त्याचं पथराने घातला घाव
काल रात्री दरडी खाली विसावला आमुचा गांव ||२||
अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला, वस्ती बकाल झाली
कष्टाने उभारलेली, स्वप्न चित्रे पार विस्कटून गेली
धावले मदतीचे हात हजारो, द्याल काहो परत आमुचा गांव
काल रात्री दरडी खाली विसावला आमुचा गांव ||३||
दगडा सारखा पहात होता लांबून, तो दगडाचा देव
काल रात्री दरडी खाली विसावला आमुचा गांव ||धृ||
