बैलजोडी
बैलजोडी
1 min
195
आज माझी बैलजोडी
कशी सजली धजली
दिमाखात दर्शनाला
अशी रूबाबी चालली ||१||
रोज राबती रानांत
तेव्हा शेत बहरली
मुक्या जीवाने आम्हाला
सुख दुःखा साथ दिली ||२||
पाणी पावसा भिजली
गाडी चिखली ओढली
रात्री उपाशी निजली
कधी नाहीच थकली ||३||
बाळ अंगावर खेळे
नाही कुणाला मारले
किती खाऊन फटके
तरी औत ना सांडले ||४||
देव मानुन मी त्यांना
आज मानाने पुजली
अशी गुणी बैलजोडी
माझं काळीज हो झाली ||५||