STORYMIRROR

Mrudula Raje

Others

3  

Mrudula Raje

Others

द्रौपदीशी बंधू शोभे

द्रौपदीशी बंधू शोभे

2 mins
296

गिऱ्हाईक बनून आला होता, भाऊ बनून गेला।

माडीवरच्या बाईला, देवळात घेऊन गेला॥

चमेलीच्या फुलांची सुकलेली माळ माझी।

तुळस-मंजिरी ईश्वरचरणी स्थान मज देऊन गेला॥


अत्तराची कुपी घेऊन शौकीन तो आला होता।

मंचकशय्या सजविण्यास तो आतूर झाला होता॥

देहाची मी भीक मागता, झाला रक्षणकर्ता।

चरणांची मी धूळ लाविता, बनला मम भाग्यविधाता॥


अपहरण करून कोणी मज ह्या बाजारी आणले होते।

सजवून, नटवून, मनाविरुद्ध खोलीत ढकलले होते॥

त्याच्या पायावर डोके ठेवून फोडला मी जेव्हा टाहो।

स्पर्शही नाही केला त्याने, म्हणाला निश्चिंत होऊन जा हो॥


रडूनिडून मी थकले तेव्हा, रुमाल देऊन वदला।

घाबरण्याचे कारण नाही, भाऊ समज तू मजला॥

नाव गाव विचारून, मजला धीर देई तो जेव्हा।

परमेश्वर भेटीला यावा, तसेच भासले तेव्हा॥


"द्रुपदी मी होते गावी, इथे रोझी म्हणतात।

बालपणाचे सुख आठवून, मनी हुंदके दाटतात॥"

हळूच हासत मला म्हणाला; " तू द्रौपदी, मी कृष्ण।

गतजन्मीची नाती जुळली, करीन मी तुझे रक्षण॥


श्रीकृष्णाचे नाव सांगण्या, नाही योग्यता माझी।

हतबल, निराश, मद्यपी बनून मी चढलो माडी तुझी॥

परि तू दिलास अर्थ माझ्या बकाल, भकास जीवना।

नैराश्याच्या दरीतून आणले बाहेर, जागवीत मम भावना॥


तू असहाय्य, असमर्थ मी; तरीही देऊ जीवना आकार।

बहीण-भाऊ बनून दोघे देऊ एकमेकांना आधार॥ 

नाही क्षमता माझ्यामध्ये, तुला इथून सोडवण्याची।

तरीही ग्वाही देतो ताई, तुझ्या राखीला जागण्याची॥"


वर्षे लोटली कितीक, आम्ही पाळत आलो नेम।

राखी-पौर्णिमा कधी न चुकवली, पाळला भावाचा धर्म॥

चुकला नाही मज भोग दैवाचा, देहविक्रय नशिबागाठी।

हा एक दिवस मी व्रतस्थ राहते, माझ्या भावासाठी॥


आयुष्य त्याचे मार्गी लागले, सुखी आहे जीवनात।

आता न येईल त्याच्या जीवनी निराशेचा झंझावात॥

वर्षाकाठी एकदा परी तो मला माहेरी नेतो।

पत्नी, मुलांच्या समक्ष मजकडून राखी बांधून घेतो॥


औक्षवंत कर देवा माझ्या ह्या पाठीराख्याला।

बाजारात सडल्या फुलाला, मधुगंध देणाऱ्याला॥

अनोखे हे नाते आमचे, अनोळखी बहीण-भाऊ।

रक्षा-बंधनाची कहाणी, आमच्या हृदयात जपून ठेवू॥


Rate this content
Log in