दळण
दळण
1 min
223
जात्यावर दळतांना
जनाईच्या ओव्या गाते
सुमधुर ओव्यांमध्ये
विठ्ठलाला बोलावते...॥१॥
हात नाजूक असून
जात्यावर मी दळते
काळा कुरूंद दगड
पीठ बारीक मिळते...॥२॥
खुटा त्याचा चकमकी
गरा गरा फिरतोय
दाणे इवले इवले
कसे छान दळतोय...॥३॥
मूठभर धान्य हाती
वर जात्यात टाकते
हातातील चुडा जरा
मागे सावरून घेते...॥४॥
कष्ट माय माऊलीचे
आज मला जाणवते
गहू बाजरीचे पीठ
जात्यावर मी दळते...॥५॥
सूप भरून बाजरी
दळण्यास घेतलेली
लयी भारी चव लागे
जात्यावर दळलेली...॥६॥
