दिशाज्ञान
दिशाज्ञान


मॅडमने आज
शिकवल्या दिशा
समजेना मला
ध्यानी ठेवू कशा?
वर्गात एकटी
बसले रुसून
बाईच बोलल्या
गालात हसून
सकाळी उठून
बघ सूर्याकडे
पूर्व दिशा तीच
ध्यानी ठेव गडे
दिशा पश्चिमेची
पाठीमागे असे
समजाया काही
अवघड नसे
उत्तर दिशा ही
असे डाव्या हाती
दक्षिणेची मग
उजव्या गं हाती
अशा आहेत या
मुख्य दिशा चार
उपदिशाही ना
अवघड फार
लक्षात असू दे
एक सोपा मंत्र
पू द प उ आणि
आ न वा ई तंत्र
घडयाळाचे काटे
फिरतात जसे
दिशांचे तंत्रही
मनी ठेव तसे