दीपस्तंभ
दीपस्तंभ
देवळात संध्याकाळी, दूर घंटानाद झाला।
दिवेलागणीची वेळ, चंद्र आभाळात आला॥
नभाच्या अंगणात, पडे रजनीचे पाऊल।
चंद्राला शोधण्या आलेल्या, तारकांची चाहूल॥
अशा ह्या कातरवेळी, मन माझे का उदास।
पाडसाने परतून यावे हाच एक ध्यास॥
येणार तो नाही, मना समजावते किती मी।
देशाच्या रक्षणासाठी, गेला दूर देशी यात्री॥
दिली प्राणांची आहुती, केला जीव समर्पण।
माझ्या लेकराने केला, जीव देशाला अर्पण॥
दुःख नाही मनीं त्याचे, वाटे मला अभिमान।
पण पिल्लू त्याचे छोटे, मागे बापाचे मज दान॥
रोज विचारतो मला, "कधी येईल परतून?।
बाबा माझा खेळायला, मला घेईल उचलून?"
कशी सांगू देवा त्याला, "बापावाचून पोरका।
आता आभाळीचा देव, तोच तुझा पाठीराखा॥
होता रोज घंटानाद, नातू धावतो अंगणी।
शोधण्यास पित्याला तो, धावे कातर त्या क्षणी ॥
कसे शिकवावे त्याला, बापावाचून जगावे।
कसे बनावे सैनिक, देशासाठी तू लढावे॥
तुझा आजा गेला रणीं, तुझा बाबा जाई पाठी।
आता देश रक्षणाचे, कार्य थोर तुझ्या माथी॥
नको, नको रे वासरा, असा खिन्न मनी होऊ।
चल मनाच्या अंगणी, एक दीपस्तंभ रोवू ॥
