देव आहे अंतरात
देव आहे अंतरात
देव नाही मंदिरात, नाही कोणत्या तीर्थात ।
ज्याचा जसा भाव तसा देव त्याच्या अंतरात ।।धृ।।
चंद्र, सूर्य, तारे, वारे अंश त्याचेच असती
ओढे नाले,नदी, झरे त्याच्या कृपेने वाहती
सर्वांठायी वास त्याचा प्रत्येकाच्या हृदयात ।।१।।
काशी गया मथुरेशी कुठे धुंडाळाया जाशी
आईबाप चारीधाम आहे ज्याचे त्याच्या पाशी
तेच मोठे तीर्थस्थान प्रत्येकाच्या जीवनात ।।२।।
कोणी रंजले गांजले त्याशी मानावे आपले
लुळे, पांगळे, आंधळे हेच गणगोत भले
भगवंत राहतसे पशू आणि पाखरांत ।।३।।
राव-रंक, सान-थोर, काळा-गोरा, उच्च-नीच
नाही कोणताही भेद सारी मुले सारखीच
जळी स्थळी काष्टी देव वसे साऱ्या जगतात ।।४।।
