चांदोबा रे चांदोबा
चांदोबा रे चांदोबा
चांदोबा रे चांदोबा मामा
शाळेत जोडीनेच जाऊ
दोघेच करूया अभ्यास
देईन तुला माझा खाऊ
हसला होतास गणेशाला
शाप दिला बाप्पांने तुला
मुखदर्शन तुझे केल्याने
कृष्णालाच डाग लागला
नाही अभ्यास नसे शाळा
चांदोबा रे मामा तू चांदोबा
हसत राहतोस आकाशात
कधी खातोस रे तुझा डबा
कधी गोल गोल वाटोळाच
कधी बनतोस बारीक कोर
वाटतोसच चांदीचा शिक्का
स्वर्गीच्या बाप्पाचेच तू पोर
गोतावळा तुझा चांदण्यांचा
लुकलूक त्याही चमकतात
अमावस्येला मात्र साऱ्याच
कुठे बरे त्या दडून बसतात
रात्रीला येतोस नभांगणी
दिवसा कुठे रे तू लपतोस
बारा तासांचे करूनी काम
अचूक वेळ कशी मापतोस
नेशील का रे मला उंचावर
आकाशातल्या तुझ्या घरी
उचलून मला तिथे न्यायला
पाठव पंखवाली सुंदर परी
आकाशातल्या चांदोबा रे
मामा तू आम्हां साऱ्याचा
पडत नाहीस ढगांमधून
झोत आला जरी वाऱ्याचा
खूप करूया मजा सारेच
खेळून तिथे तारकांत रंगे
घेऊन येईन मग खिशातून
एखादी चांदणीच मजसंगे
