बंधू राजा माझा
बंधू राजा माझा
सय येते बंधूची भाऊबीजेला
माझे माहेर छोट्या खेड्यात
आईबाबा दादा आणि वहिनी
राही गुण्यागोविंदाने सुखात
माझ्या दादाचा चौसोपी वाडा
नोकरचाकरांचा हा बारदाना
पाच-दहा अतिथि पाहूणचारा
हासून वहिनीही रांधती त्यांना
मधू नि सोनू भाचरे गुणाची
आठवण काढती आत्याची
फोन करून रोजच बोलवती
एकच आत्या प्रेमळ त्यांची
वहिनीची या माया आईवाणी
जशी बहीणच कर्ती सवरती
सांगते कौतुक दादावहिनीचे
दरवेळेला माझी बाजू सावरती
किती लाडाकोडाचे माहेर माझे
सणासुदीला मज न्याया यायचे
बहीण दादाची आहे मी लाडूली
मुलांचे कोडकौतुकच व्हायचे
आई बाबा आहेत खूप भाग्याचे
लाभला कुलदीपक त्यांना न्यारा
कष्ट मेहनत तया सदाच ठावूक
गावातील साऱ्यांचा दादा प्यारा
