बहिणीची माया
बहिणीची माया
कुटुंबाला जोडण्यासाठी तिने खाल्ल्या खस्ता अनेक।
एकत्र ठेवण्यासाठी भावांना, झटत राहिली ती क्षण प्रत्येक॥
चार भावांची तोंडे होती पांगलेली चार दिशांना।
जवळीक साधावी कधी, इतका वेळही नव्हता सर्वांना॥
प्रत्येकजण आपल्याच तोऱ्यात, प्रत्येकाची तऱ्हाच न्यारी।
एकमेकांच्या चुका दाखवण्या, शब्दांची तलवार दुधारी॥
अशा विभक्त कुटुंबाचा कसा साधावा ताळमेळ?।
कोण देईल कुटुंबाला जोडण्यासाठी अमूल्य वेळ?॥
एक बहीण चार भावांची, जणू चंपक कळी उमलली।
चार भावांचे ऐक्य साधण्या, देवाने जणू परी धाडली ॥
एकच मागणे मागते भावांना, नका देऊ एकमेका अंतर।
कुटुंबाला जोडून ठेवा, ठेवा माझे माहेर निरंतर॥
नको मला रे पैसा-अडका, नको तुमचा जमीन-जुमला।
माझ्या हिश्श्यावरती बांधा, तुमच्यासाठी एकच बंगला॥
जमा कधी वेळ काढून तेथे, जमेल आपले कुटुंब मोठे।
जोडून सारी नाती-गोती, स्वर्गच मजला जगी ह्या भेटे॥
