बावनकशी सोनं
बावनकशी सोनं
खानदेश जळगाव आसोदे गावी
२४ऑगस्ट १८८० साली.
कन्यारत्न ती बहिणाबाई
भिमाई पोटी जन्मा आली..
साधी भोळी राहणी तिची
साधा भोळा सोज्वळ स्वभाव.
वाचता नसे येत तिला
पण बुध्दीचा नव्हता अभाव..
उखाजी महाजन त्यांचे पिता
तीन भाऊ अन् तीन बहिणी.
तेराव्या वयात झाला विवाह
बनली नथुजी चौधरींची पत्नी..
तीन अपत्य जन्मा घातले
प्लेगने एक मुल अपंग झाले
तिसाव्या वयात वधैव्य आले
पती पत्नीचे नाते दुरावले.
जिवंतकाव्य रचनेची
देण होती तिला निसर्गाची.
अहिराणीतील ओव्यांची
गायली गाणी आवडीची..
जात्यावरती दळतानाही
गोड गळ्याने गायची गाणी.
मोहक मधुर सुरांची
धुंद करणारी तिची वाणी..
अनोळखी पुस्तकी अक्षर
शिक्षणाने होती निरक्षर.
पण नव्हती ज्ञानात अडाणी
बुध्दीने तर खुप साक्षर..
असो कितीही व्यस्त
रोजच्या कामात आपल्या.
त्या कामावरतीच तिने
कवितेच्या आवडी जपल्या..
कविता,ओव्या ,अभंग
रचल्या तिने एकसंग.
कामासोबत होऊनी दंग
गाण्यातही आणायची रंग..
शेतीमाती कापणी, मळणी
सासर, माहेर, निसर्ग नि प्राणी.
सुख दु:खाची त्यांच्या मांडणी
सोप्या शब्दांची गोड पेरणी..
संसाराची चढउतार कहाणी
सणासुदीची सुंदर गाणी
सरळ सोपी सहजतेने
करायची ती आत्मियतेनी
मानवाच्या आयुष्यातील
धडपड जगण्यासाठीची.
जीवन मरणाची गाथा
सहज शब्दांतून सांगायची..
नसानसात भिनलेल्या
तिच्या कवितांच्या ओळी.
शब्द सुमनांनी भरलेली
तिच्या ज्ञानाची झोळी..
अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके
तव्ह मियते भाकर
मन वढाय वढाय
उभ्या पिकातंलं ढोरं
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकावरं
अहिराणीची भाषा बोली
बोली भाषेतच लिहिली गाणी.
देऊनी सुंदर काव्यरुप
शेजा-यांनी केली लेखणी..
बंधु अन् पुत्र सोपानदेव यांना
साथ गुरू आचार्यांची लाभता.
मृत्युनंतर झाल्या प्रकाशित
या माय माऊलीच्या कविता..
जुन्यात चमकेल अन्
नव्यात झळकेल असलं
बावनकशी सोनं आम्हा
तिच्या रुपात लाभलं..
३ डिसेंबर १९५१ साली
हा काव्यसूर्य मावळला.
नारीविश्वाच्या माळेमधूनी
एक अनमोल मोती ढळला..
