बापाचं सपान
बापाचं सपान
1 min
190
मला शाळा शिकायची
पण वाटच घावना
कशी जाऊ मी पल्याड
पाणी नदीचं आटना ॥1॥
बाप बघतो सपान
मी मोडाव कुपान
त्याच्या गळक्या घराला
मी कराव लिपाण ॥2॥
पोर शाळेत जाईल
सुख घरात येईल
साऱ्या वस्तीत ज्ञानाचा
ती उजेड दाविल ॥3॥
पाणी नदीचं भरता
जीव होतो खालीवर
बाप भिजतो पाण्यात
मला घेई डोईवर ॥4॥
असे कैक वरीस
बाप शिरला पाण्यात
माझी रचली हयात
पोर शिकली बाण्यात ॥5॥
पायरी शाळेची चढता
डोळीं अश्रू दाटतं
त्याच सपान माझ्यात
पूरं झाल्याच वाटतं ॥6॥
