बाप
बाप
1 min
111
बाप नावाचं झाड,
उभं असतं ऊन्हातान्हात..
पाखरांना सावली देत,
बाप नावाचं झाड...
गुलमोहरासारखं
लाल जखमा अंगावर घेऊन
फुलणारं!
बाप नावाचं झाड,
मुळाशी असतं चिंतेचं वारूळ
पोखरत असतं ते त्याला !
पाखरं घासून आपल्या चोची
करतात घायाळ,
पाखरं पोखरतात सुतार होऊन
तरीही उभच असतं
बाप नावाचं झाड...
त्याला पहायचा असतो वसंत
पाखरांसाठी...
कापला तरी पुन्हा उगवतं
बाप नावाचं झाड,
फांदीवरच्या घरट्यासाठी-
भाग असतं जगणं
बाप नावाच्या झाडाला !
बाप नावाचं झाडहि कधी कधी
शोधत असतं सावली,
पण त्याने जावं कुठे सावलीसाठी...
त्याची मुळं घट्ट चिकटलेली असतात
कर्तव्याच्या मातीला!
