बाप
बाप
शेतामंदी आमच्या नायी
आनंदाला माप
इथं दिन रात राबे
माझा शेतकरी बाप
भल्या पहाटे बाप उठे
शेताकडे जाई
त्याच्या मागनं जाती
गुरं आणि गाई
सर्जा नि राजाला
हाय माझ्या बापाचा लळा
त्याच्या संग जाताना
वाजती घुंगुरमाळा
माझा बाप शेतकरी
भ्याला नाय अस्मानी संकटाला
एकट्यानं उभं केलं शेत
जुमानलं नाही कशाला
अडचणीला तोंड देणं
शिकवलं ह्याने
जगण्याची रीत
समजावली त्याने
सांच्या येळेला
बाप थोडी इश्रांती घेई
पडल्यावरी लागे डोळा
खरे कष्ट घेई
शिकवलं त्याने
खरा सुवास घामाचा
कष्टानं मोठं व्हा
डाग नको कशाचा
असा ह्यो बळीराजा
समद्यांवर प्रेम करी
लक्ष्मी भारी पाणी
नि सुख नांदे घरी
