बालपणीचा काळ सुखाचा
बालपणीचा काळ सुखाचा
बालपणीचा काळ सुखाचा
स्वातंत्र्याचा आनंदाचा,
नाही दडपण चिंता नाही
कामाची ही नाही घाई
चिमणे चिमणे हट्ट करुनी
रुसवे फुगवे सतत घेऊनी,
जे हवे ते येई मिळवता
लाड पुरविती आई बाबा
वह्या पुस्तके शाळा घंटा
छोट्या गमती ,छोटा तंटा ,
वाद ही असती क्षणाभराचे
सहजच जाती विसरूनीया ते
मौजेची ती वाटे शाळा
ज्ञान वाटते चिमण्या बाळा ,
खाऊ खाऊनी मधल्या सुट्टी
शाळेचा मग ये कंटाळा
रोज कारणे नवीन सुचती
शाळेला माराया बुट्टी ,
सरता मग शाळेची वेळ
संपत नाही सुरूच खेळ
मोठ्यांचा मग खाऊन मार
रुसून बसणे मिनिटे चार ,
पाहुनी आवडता तो खाऊ
रुसवा राग ही विसरुनी जाऊ
कुठे हरवले बालपण ते
होते जवळी काल पण ते ,
छानशी एक जादू घडावी
छोटीशी मी परत मिळावी
असे मागणे तुमच्या पायी
छोटीशी मज कायम ठेवा,
रम्य वाटे ते बालपण मज
फिरुनी लहान कर ना देवा
