बालपण
बालपण
अवखळ आणि निरागस
होती खूप मजा
कितीही खेळा बागडा
नव्हती कसली सजा
चिंचा नि कैऱ्या पाडायला
झाडावर चढायचे
बोरे नि आवळे
सगळे पळवायचे
नव्हती अभ्यासाची भीती
नव्हता कुणाचा धाक
खेळताना रडारडी
तरी वर आमचे नाक
आट्यापाट्या आपाधुपी
कबड्डी नि गोट्या
सगळे सोबत खेळत
गोंधळाचा त्रास माणसांना मोठ्या
दिवसभर हुंदडून
घरी यायचो
शुभंकरोती म्हणुनी
उजळणी करायचो
गरम गरम जेवणावर
आडवा हात पडायचा
आईच्या हातच्या चवीचा
एक लाडू ठरलेला असायचा
रात्री गोधडीची ऊब
नि गोष्टी आजीच्या
फिरून येत असू परी राज्यात
आणि दरबारात जात असू राजाच्या
आता झालो मोठे
अडकलो राहाटीत जगाच्या
अजूनही आठवतात
गोष्टी लहानपणाच्या
अजूनही नाही विसरलो आम्ही
लहानपणीचा मेवा
करतो रोज प्रार्थना
लहानपण देगा देवा
