बालक्षण
बालक्षण
1 min
211
खुशीत निजवते चंद्रतारे
पापण्यात दिसे स्वप्नपरी
स्वच्छंदी मनमुराद मनाची
सळसळणारी नवी सरी ॥१॥
मुक्त गगनात भरकटती
रानपाखरे इवलीशी
देहभान विसरून दंग
नाते जोडे नवे धरणीशी॥२॥
ओंजळीत बहुआकाराचे
समुद्री दगडधोंडे वेचती
वर्षाच्या टिपटिप धारेवर
मयूरासम बेधुंद नाचती॥३॥
चिखल तुडवित पावलांची
चाले मनसोक्त मस्ती
मलिन वस्त्र होण्याची
नसे कोणतेही धास्ती ॥४॥
खुदकन गालात चमकतो
तारा अवखळ मनाचा
नित्यक्रम खोड्या सुखावते
आठवण अल्लड क्षणांचा ॥५॥
मृगजळासम सुवासिक
क्षणभंगुर बालक्षण
उतारवयात साथ देई
क्षणोक्षणी ती उजळण ॥६॥
