बाजार मांडला आहे...
बाजार मांडला आहे...
तापलेली माती घामाने भिजवून,
हसत मुखाने कांदा-भाकर खाऊन,
पोटाची खळगी भरे..
दुसऱ्यांसाठी मर मरे..
तरीही शेतकऱ्याला मिळे ना,
सुख आणि समृद्धी...
जणू त्याच्या कष्टाचा,
बाजार मांडला आहे..
सळसळतं ऊन डोक्यावर घेत,
सोनं पिकवण्याचं स्वप्न बघतो
आणि आलेल्या दुष्काळानं,
मन खचतं
जणू त्याच्या नशिबाचा,
बाजार मांडला आहे..
चटक्यांनी उन्हात भाजून निघतो,
पावसाचा पहिला थेंब
काळ्या ढेकळावर पडलेला बघतो
तेव्हा सगळं दुःख विसरतो
कष्ट तो खूप करतो,
तरीही दुःखातच मोजतो
जणू त्याच्या कष्टांचा,
बाजार मांडला आहे..
सहनशीलता संपल्यावर,
तो संप पुकारतो
शासन त्याला मूर्खपणाचं
नाव देतो.. आता तर,
त्याच्या कष्टासोबत त्याच्या
भावनांचा देखील,
बाजार मांडला आहे..
