STORYMIRROR

निलेश कवडे

Others

3  

निलेश कवडे

Others

बाभळ

बाभळ

1 min
289

वैशाखातही बाभळ

हिरवळ सांभाळते

गर्द हिरव्या शालूचा 

साज नाजूक नेसते


सोनपिवळ्या रंगाच्या

चांदण्यांनी उजळते

सडा सोनेरी फुलांचा

रानामध्ये शिंपडते 


मोरपीस फिरवून

तिला कोणी स्पर्श केला

शहारून बाभळीच्या 

अंगभर काटा आला


बाभळीच्या फांदीवर 

वारा नशेत झुलतो

काटा काटा बाभळीचा

गीत व्यथांचे रचतो


चंद्र वयात आलेला

काटा एकेक शोधतो

आणि चंदेरी रेघोट्या 

त्याच्यावरती ओढतो


जरी तुळशी सारखे 

नाही लाभले अंगण

गार सावली करते

वाटसरूंचे औक्षण


कमनीय बांध्यासह

उभी एकटी रानात

जणू शील जपण्याचे

तिच्या औदार्य काट्यात


खोडावरच्या थराचा

वाटे पाहून पापुद्रा

उमटली तिच्यावर

निसर्गाची राजमुद्रा


काळजात मी अशीच

एक जपली बाभळ

मला वादळातही ती

देते जगण्याचे बळ


Rate this content
Log in