अतिथी
अतिथी
आज शरद पौर्णिमेच्या राती।
कोण माझ्या घरी येई अतिथी।
माझ्या प्राणांच्या द्वारी हा।
कोण पाहुणा आला रे।
आनंदगान गा रे , मना, आनंदगान गा रे ॥
नीरव निळ्या आकाशाची।
ही कथा व्याकुळ हृदयाची।
आज झंकारली तुझिया।
वीणेच्या सूर-झंकारे।
आनंदगान गा रे, मना, आनंदगान गा रे॥
फुलली राईची पिवळी शेते।
गाऊ लागली सुवर्ण गीते।
तानेमध्ये तान मिसळुनी।
स्वरगंगेच्या पवित्र जलातुनी।
सूर तुझाही वाहू दे रे।
आनंदगान गा रे, मना, आनंदगान गा रे॥
आला जो तुझ्या दारी अतिथी ।
पाहा मुख त्याचे प्रसन्न चित्ती।
उघडुनी कवाड हृदयाचे तू।
कर प्रस्थान दूर देशा रे।
आनंदगान गा रे, मना, आनंदगान गा रे॥
( कविगुरु रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतन येथे १८, भाद्रपद, १३१६ रोजी लिहिलेल्या शिर्षक-विरहीत कवितेचा हा मराठी भावानुवाद आहे.)
