अंत (गझल)
अंत (गझल)
नको विव्हळू असा तू त्या वेदनेसही अंत आहे,
नाही दिसत आकाश पूर्ण परि त्या नभासही अंत आहे।
पाझरणारे तुझे अंतःकरण फक्त तुलाच समजते,
अंतरातल्या यातनेची तुझ्या इथे कुणास खंत आहे।
दाटले मेघ काळेभोर तुझ्या अवतीभवती तरी,
ते दाटलेले आभाळ पाहण्यास इथे कुणा उसंत आहे?।
तूच पडावे तूच उठावे सावरावेही स्वतःला तूच,
करून घे मार्गातला अंधार दूर तूच मशाल ज्वलंत आहे।
घे अथांग सागरात उडी बुडणाऱ्या त्या नौकेतून,
पोचशील तू नक्कीच किनार्यावर प्रवाह तो संथ आहे।
हारशील तरच जिंकशील हाच जगण्याचा मंत्र आहे,
नको जाऊ असा हरून एक दिवस या खेळाचाही अंत आहे।
