अनाथ
अनाथ
नेहमी प्रश्न पडतो मला नेमके अनाथ म्हणावे कोणाला
जन्म देताना जी मुकली प्राणाला अनाथ म्हणावे का त्या बाळाला?
अचानक घर कुटुंबाला वैतागून गरिबी अन कर्जाला
ज्या शेतकऱ्याने लटकावून घेतले फासाला
अनाथ म्हणावे का त्या कुटुंबाला?
रात्रंदिवस कष्ट केले स्वतःचे पोट रिकामे ठेवले
खूप शिकवून मुलाला परदेशी पाठविले
मुलगा तिकडचाच झाला
आई वडिलांना विसरून गेला
म्हातारपणाचा आधार सुटला
अनाथ म्हणावे का त्या आई बापाला?
व्यभिचाराने जी स्त्री वागते
नवऱ्याचा ना मुलांचा विचार करते
संसाराची पर्वा कधी ना करते
हव्यासापायी घरदार सोडते
अनाथ म्हणावे का त्या घराला?
जीवापाड प्रेम ज्याच्यावर करते
त्याच्या प्रेमासाठी मर्यादा सोडते
नराधमाच्या वासनेची शिकार होते
जन्म देते प्रेमाच्या निशाणीला
स्वीकारले नाही म्हणून सोडून देते त्या बाळाला
अनाथ म्हणावे का त्या अबला मातेला?
लाडात लहानाचे मोठे केले
सुखी म्हातारपणाची स्वप्न पाहिले
बायकोच्या हट्टापायी वृद्धाश्रमात सोडले
अनाथ म्हणावे का त्या वृद्धांना?
