अक्षरखेळ...
अक्षरखेळ...
वेडेपणा कुणी म्हणोत याला
हा तर अक्षरखेळ
एकाकीपण दूर सारतो
मजेत जातो वेळ
वेडेपणा कुणी....
कथा कविता गाणी गोष्टी
हा तर अक्षरमेळ
सतत घालती झिम्मा फुगडी
चाले शब्दांचा तो खेळ
वेडेपणा कुणी....
डोंगर दरी अन् कडेकपारी
गाठती डोहाचा कधी तळ
रानामधुनी फिरता फिरता
नदीची ऐकावी खळखळ
वेडेपणा कुणी....
कधी आकाशी घेऊनी जाती
मनी उठवी कल्लोळ
उंच भरारी घेत जोखावे
शब्दपंखांचे ते बळ
वेडेपणा कुणी....
कधी हसवती कधी रडवती
घालविती मर्कटचेष्टेत वेळ
लहान मुलासम कधी खेळती
छान किती ते खेळ
वेडेपणा कुणी...
अंतर्मनात कधी ते शिरती
मिळतो आनंद निर्भेळ
संवाद साधता परमेशाशी
ना समजे कधी सरला वेळ
वेडेपणा कुणी...
