अदृष्य रेषा
अदृष्य रेषा
डोळ्यात सुखी संसाराचे घेऊन स्वप्न
केला गृहप्रवेश तिने माप ओलांडून
संपताच नऊ दिवस नव्या नवरीचे
कळून आले वास्तव बंधनाचे
संपले बंधन मुक्त जीवन बालपणीचे,
नित नव्या संघर्षाची रीघ लागली.
नवनवे आव्हान पेलतांना, काहीशी
'अदृष्य रेषा' भोवती जाणवू लागली,.
जशी गाय गोठ्यात बांधून असते
तशीच स्थिती मला बाईची भासते.
म्हणावयास जरी असते ती स्वतंत्र
परि भोवती तिच्या वलय असते
बंधनाला, कुंपणाला नाही हरकत तिची
मना जोगे तिथे तरी, तिला जगता यावे.
काही इच्छा,आशा असतील तिच्याही
माणूस तीही आहे हे, समजून घ्यावे.
न दिसणार्या रेघोट्यात स्त्री गुंतत जाते,
गोतावळ्यात अस्तित्व, स्वतःचे विसरते.
स्वत्वाची जाणीव जेव्हा तिला होते,
तोवर तिची ताकत, उमेद संपलेली असते.
